Jul 24, 2014

मृत्युंजय X ययाती


                  
‘ययाती’ आणि ‘मृत्युंजय’ या मराठीतील अविस्मरणीय साहित्यकृती. दोन्ही कादंबर्‍यांचे लेखक कोल्हापूरच्या सांस्कृतिक जीवनात लहानाचे मोठे झालेले. दोघेही कोल्हापूरचे. ‘ययाती’चे लेखक विष्णू सखाराम खांडेकर आणि ‘मृत्युंजय’चे लेखक शिवाजी सावंत दोघेही व्यवसायाने शिक्षक. ‘मृत्युंजय’ प्रसिद्ध झाले ते १९६७ साली. ‘ययाती’ दाखल झाले १९५९ सालात. ‘मृत्युंजय’ ७०० पानांची मार्मिक कादंबरी. ‘ययाती’ची पृष्ठसंख्या ३६१. लेखक म्हणून ५७ वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्यानंतर खांडेकरांनी ‘ययाती’ लिहिण्याचे धाडस दाखविले. याउलट शिवाजी सावंतांनी वयाच्या २७ व्या वर्षी ‘मृत्युंजय’ लिहून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. कर्णाविषयी भरपूर साहित्य उपलब्ध होते, यात शंकाच नाही. ययातीविषयी कदाचित तेवढी माहिती उपलब्ध नव्हती, पण म्हणूनच प्रामाणिकपणाच्या कसोटीवर खरे उतरण्याचे ‘मृत्युंजय’पुढे मोठे आव्हान होते. तर ‘ययाती’चा विषय लेखकाला भरपूर सवलती देतो. आपला ययाती महाभारतातील ययाती नसल्याचे खुद्द खांडेकरांनी आपल्या प्रस्तावनेत नमूद केले आहे. देवयानी आणि शर्मिष्ठा ही पात्रेही महाभारताच्या कथेपेक्षा बरीच भिन्न आहेत. कोणत्याही प्रमुख पौराणिक किंवा ऐतिहासिक व्यक्तींचे चित्रण करताना हवे ते बदल करण्याचा अधिकार ललित लेखकाला नसतो, हे मी मान्य करतो. कालिदासाच्या शकुंतलेच्या सौंदर्याचे संदर्भ देऊन खांडेकरांनी मर्यादाभंग करण्याचे रहस्य सांगितले आहे. लालित्यपूर्ण साहित्याची उत्तेजना चेतवून ‘ययाती’ आम्हाला मध्येच सोडून देतो. आपले गंभीर अध्यात्म आणि जीवनदर्शन घेऊन अधूनमधून कचदेव अवतरतात, पण त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्याचा कुठेही आग्रह दिसत नाही. मूळ महाभारतात कचदेव संजीवनी विद्या प्राप्त करून देवलोकात निघून जातात, असे खुद्द खांडेकरांनीच मान्य केले आहे, पण ‘ययाती’मध्ये देवयानीच्या वैवाहिक जीवनाला आग लावल्यानंतर आणि ती आग १८ वर्षे धुमसत राहिल्यानंतर तिला विझविण्यासाठी कचदेव तपश्चर्या सोडून येतात.

‘मृत्युंजय’ ही कर्णाची कथा प्रामाणिक आहे; शोधावर आधारित. महायुद्धापूर्वी कृष्ण आणि कर्ण तसेच नंतर राजमाता कुंती आणि दानशूर कर्ण यांच्यातील संवाद समस्त भारतीय साहित्याचा सवरेत्कृष्ट वारसा मानता येईल. ‘ययाती’मधील कोणताही प्रसंग एवढय़ा मार्मिकपणे व्यक्त झालेला नाही. एकीकडे दुर्वास आहेत, तर दुसरीकडे शुक्राचार्य. दोघेही तपस्वी क्रोधासाठी विख्यात. महाराणी कुंती आणि दुर्वास ऋषींचे अलौकिक संबंध शब्दांत व्यक्त करणे शक्य नसले तरीही वाचकांच्या मनावर कोरले गेले आहेत. शुक्राचार्य आणि देवयानीचे पिता-कन्येचे लौकिक संबंध मात्र भरपूर संवाद आणि दृश्यात्मक तो असूनसुद्धा ययातीपुत्र पुरू आणि कुंतीपुत्र कर्ण दोघेही एकच शाप भोगत आहेत. जन्मत:च पुरू आपल्या पित्यापासून आणि कर्ण आपल्या मातेपासून विभक्त होऊन एक अनामिक जीवन जगण्यासाठी अभिशापित आहेत; परंतु दोघांचीही आपल्या माता व पित्याशी भेट नियतीने लिहून ठेवली आहे. नियतीचे हे विधान म्हणजे सामान्य घटना नाही. ‘मृत्युंजय’ या भेटीला एका उत्सवाच्या स्वरूपात सादर करतो. ७५ वर्षांच्या वयात कर्ण प्रथमच माता कुंतीला भेटतो. तो जेव्हा कुंतीला आई म्हणून पहिल्यांदा हाक मारतो तेव्हा असे अलौकिक दृश्य उद्भवते जणू काही साक्षात गंगामाता मोहरून गेली आहे, सूर्यदेव आपल्या पुत्राच्या आनंदातिरेकात ढोल वाजवू लागले आहेत! वयाच्या अठराव्या वर्षी पुरू जेव्हा प्रथमच त्याचे पिता आणि हस्तिनापूरचे राजा महाराज ययातीला भेटतो तेव्हा ना वेदनेचा बांध फुटत ना उत्सवाचे ढोल वाजत. जर या दृश्यात पुरूकडून पित्याचे वृद्धत्व ग्रहण करण्याची कथा जोडली गेली नसती तर बर्फाचे थंडत्वही कमी पडले असते. कादंबरी आणि कथेत एक मौलिक अंतर असते, हे मी मानतो. प्रत्येक कथेचा शेवट अकस्मात व्हायला हवा आणि कथा जिथे संपते तिथून पुढे विचार करण्यास वाचक उत्सुक व्हायला हवा. कादंबरीचा शेवट एका उत्कर्ष बिंदूवर व्हायला हवा आणि तो उत्सवपूर्ण असायला हवा. कादंबरीचा शेवट पूर्ण कथेला एका शिखरावर पोहोचविणारा असायला हवा.

‘ययाती’ ते शिखर गाठत नाही. कादंबरी अचानक संपते. कचदेवाचे उबग आणणारे दर्शन, देवयानीचे चारित्रिक परिवर्तन, सवत शर्मिष्ठाविषयी देवयानीचा नवा दृष्टिकोन आणि महाराजांची वानप्रस्थाश्रमाची गुळमुळीत घोषणा..

‘मृत्युंजय’मध्ये रणांगणात आपले सर्वस्व अर्पण करणार्‍या कर्णाचा उत्सव खुद्द भगवान श्रीकृष्ण साजरा करतात. एका महायोद्धय़ाला वीरगती लाभत असतानाचे अद्भुत वर्णन, श्रीकृष्णाकडून होणारा कर्णाचा अंतिम संस्कार, राजमाता कुंतीचा आक्रोश आणि पत्नी वृषालीची आत्माहुती! सातशेव्या पानावर कोणत्याही वाचकाला रडू कोसळावे! ‘ययाती’नेही मला अंतर्मुख केले, पण तेवढे नाही. रडविले तर नाहीच! दोन्ही आत्मचरित्रात्मक कादंबर्‍या. खांडेकर आणि शिवाजी सावंत यांच्या शैली एकच, पण ‘ययाती’ची प्रभावरेषा मला ‘मृत्युंजय’पेक्षा पुढे जात असल्याचे भासले नाही; परंतु भारतीय साहित्याचा सवरेत्कृष्ट सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार ‘मृत्युंजय’ला नाही, तर ‘ययाती’ला मिळतो. भारतीय साहित्याच्या इतिहासातील ही एक घोडचूक तर नसेल?

(भारतीय ज्ञानपीठातर्फे प्रकाशित केल्या जाणार्‍या ‘नया ज्ञानोदय’ या साहित्याला वाहून घेतलेल्या मासिकाच्या ऑक्टोबर २०११च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख)

No comments:

Post a Comment