Oct 30, 2011

एक अकेली इस शहर में...

गेल्या आठवड्यात विवेका बाबाजीने आपलं एकटेपण पंख्याला लटकवलं आणि असंख्य प्रश्ान्चिन्ह मागे ठेवत ती निघून गेली...स्वत:चं अस्तित्व शोधायला अशा अनेक विवेका रोज या महानगरीत दाखल होतात. मंबईच्या वेगाशी, तिच्या रंगाशी जुळवून घेणं जमतं त्यांना मुंबई आपलंसं करते. नाहीतर लाखोंच्या गदीर्तही या शहरात वाट्याला येतं ते असह्य एकटेपण. मुंबईसारखं गदीर्चं आणि तरीही एकटं शहर नाही म्हणतात. हे एकटेपण इथे मैत्रीण शोधत फिरत असतं, तुम्ही एकदा त्याला आपलंसं केलंत की मग ही साथ कायमची...

मुंबईसोबत धावताना वेळ कमी पडतो. इथेच जन्मली, वाढलेली माणसं इथल्या धावत्या संस्कृतीशी एकरूप होऊन जातात. मुंबईबाहेरून आलेल्यांना हे प्रचंड अवघड जातं. मुलं चटकन रुळतात,पण कुटुंबाच्या सुरक्षित आणि उबदार कवचातून बाहेर पडलेल्या मुलींना ते जड जातं. इथलं वर्क कल्चर प्रचंड प्रोफेशनल आहे. 'द परफॉर्मर विल र्सव्हाइव' हा इथला मंत्र आहे. कामाला घड्याळाचं बंधन नाही, महत्त्वाकांक्षेला कुंपणही नाही त्यामुळे रात्रंदिवस काम करणं ही गरज होते, नव्हे या कामाची झिंग चढते. यातलं नवेपण संपून त्याचं रुटीन होतं तेव्हा एकटेपणाशी पहिली ओळख होते.

सोनल एमसीएस होऊन वर्षभरापूर्वी मुंबईत आली. चांगल्या कंपनीत नोकरी करते. पण मुंबईत एकही मित्र मैत्रीण नाही. ती म्हणते, 'ऑफिस कल्चरमध्ये कुणाशी हळवे कोपरे उघड करावेत हे अपेक्षित नसतं. सततच घाई, डेडलाइन्स. त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर 'डू नॉट डिस्टर्ब'ची अदृष्य पाटी सततच लावलेली. साधा कुणाला फोन करायचा तर आधी एसएमएस करून करून विचारायचं. असं असल्यावर कुणाशी अन् काय शेअर करावं?'

इथल्या प्रोफेशनॅलिझमचा चेहरा क्रूर वाटावा इतका कठोर आहे. बड्या टीव्ही चॅनलवरच्या एका चकचकीत मालिकेतला लीड रोल करणारी जेमतेम वीस वर्षांची मुलगी. मुंबईत नुकतीच आलेली. तापानं फणफणली. गोळ्या घेऊन दोन दिवस अंगावर काढलं. प्रॉडक्शनने लाखो रुपये लावलेले. शूटिंग सोडून जाणं परवडणारं नाही. काम करताना भोवळ येऊन पडली. कुटुंब दूर बिहारमध्ये. तिला एखाद दिवस सोबत करायला, घरी घेऊन जायलाही कुणी तयार नाही...अखेर पालक येईपर्यंत गयावया करत एका सहकलाकाराकडे रात्रभर राहिली.

इथे माणसं सहज जोडली जात नाहीत. नाती सांभाळली गेलीच तर दोन्ही बाजूंना सोयीची असतील तर.. प्रोफेशनल. निखळ मैत्री दुर्मिळ. एखादा कटू अनुभव आला की मुली आणखी सावध होतात. स्वत:ला आक्रसून घेतात. कधी कुणात गुंतणं होतं. लाँग टर्म कमिटमेंट हा प्रकार हरवतोय. त्यामुळे एकमेकांसोबत मजा येतेय तोपर्यंत राहू एकत्र. नाहीच जमलं तर मार्ग मोकळे. अजून हे छोट्या शहरांमध्ये रुजलेलं नाही. पायाच ठिसूळ असलेली ही नाती तुटतात, तेव्हा मुली कोसळतात. आपण नाकारले गेलोय म्हणजे आपल्यातच काहीतरी कमी आहे ही जाणीव कुरतडत राहते. तात्पुरतं वापरून फेकून दिल्याची भावना आयुष्य झाकोळून टाकते. यातून डोळसपणे बाहेर पडणाऱ्या तगून जातात. नाहीतर एकटेपणा घालवायला नव्या नात्याचा शोध,व्यसनाधिनता, लेट नाइट पार्ट्या, आऊटिंग त्यातून पुन्हा अपेक्षाभंग असं दुष्टचक्र चालू राहतं.

एकटेपणाला पर्याय म्हणून शोधला गेलेला आधार म्हणजे सोशल नेटवर्किंग साइट्स. यांत र्व्हच्युअली गुंतणं मुलींना जास्त सुरक्षित वाटतं. आपण जे नाहीच ते सतत दाखवत राहणं, एका काल्पनिक विश्वात रमणं हेच ��युष्य होतं. अर्धवट ओळखीच्या लोकांशी झालेली ही काही मिनिटांची र्व्हच्युअल मैत्री आयुष्याचा सप्तरंगी तुकडा बनून जाते. खऱ्या अडचणी, तणाव मनाच्या तळाशी साठत राहतात अन् मग एखाद दिवस त्याचा स्फोट होतो. विवेका शेवटच्या दिवसापर्यंत आपण आनंदी आणि मजेत असल्याचं फेसबुकवर लिहीत होती...

मी आणि माझं आयुष्य हा कोष इतका घट्ट होत जातो की त्यातून सगळ्यात जवळचं कुटुंबही कधी दुरावतं कळत नाही. नातेसंबंधांच्या कामाच्या ठिकाणच्या समस्या कुटुंबाशी शेअर करणं हे पराभवाचं वाटू लागतं. माझ्या समस्यांमुळे त्यांना कशाला त्रास असाही विचार होतो. त्यातून आपलं कुणी नाहीच ही नकारात्मक भावना अधोरेखित होते...

तीन वर्षे मुंबईत एकटं राहून पत्रकारिता केलेल्या करुणाचाही हाच अनुभव आहे. ती म्हणते इथे कुणी स्वत:हून तुमच्या जगण्यात नाक खुपसणार नाही. त्यासाठी पहिला हात तुम्ही पुढे करायला हवा. हे जितकं लवकर जमेल तेवढं हे शहर आणि इथली माणसं तुमची होतील. कुटुंबाशी सततचा संपर्क, त्यांच्याशी शेअरिंग हेही महत्त्वाचं. त्यांना न पटणाऱ्या गोष्टीही त्यांना माहीत असल्या की नात्यांतली विश्वासार्हता टिकते, हे तिचं निरीक्षण.

पहिल्यांदा या शहराला आपलसं करा असा सल्ला शुभांगी गोखले देते. शुभांगी मराठी अन् हिंदीतली आघाडीची अभिनेत्री. या शहरात मिसळून स्वत:ची खास ओळख निर्माण करताना जीवलगांच्या वियोगातून आलेलं एकाकीपण पचवत ती जिद्दीनं उभी आहे. 'मुंबईत आल्यावर तुम्ही कशासाठी आलात याची खूणगाठ पक्की हवी. आयुष्याचं परफेक्ट मॅनेजमेंट हवं. तुम्ही नुसतं काम करताय की लक्षात राहील असं काम करताय, हे तपासायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं इतर कुणाशी स्पर्धा करण्याऐवजी ती स्वत:शी हवी, हे ती सांगते. शुभांगीच्या मित्र मैत्रिणी हा तिचा अॅसेट आहे, तुम्ही हेतू ठेऊन मैत्री केलीत की तशीच परत मिळेल. वेळ लागला तरी चालेल पण माणसं पारखून घ्यायला हवीत. रोजचं काम संपवून घरी आल्यावर त्यातून बाहेर पडणं हे महत्त्वाचं. शुभांगी त्याला स्वत:ला 'अनवाइंड' करणं म्हणते. ते संगीत, वाचन, सिनेमा, अध्यात्म, टीव्ही काहीही असेल. दिवसाच्या शेवटी आपल्या माणसांशी फोनवर दोन शब्द बोललं तरी खूप बरं वाटतं. झोपताना मी आज माझ्या जगण्यात शंभर टक्के काँट्रीब्युट केलं हे समाधान असलं की स्वत:ला गिल्टलेस गुडनाइट देता येतो'...हे तिच्या जगण्याचं सूत्र आहे.

क्लिनिकल सायकोलॉजिस्ट गौरी कोठारी यांना एकटेपण हे व्यक्तिमत्वाचा भाग आहे असं वाटतं. जी माणसं दुसऱ्यांच्या नजरेतून स्वत:कडे बघतात, त्यांना लवकर निराशा येते. स्वत:वर प्रेम करणारी माणसंच स्वत:ला माफ करू शकतात. आपल्या कपॅसिटीज अन लिमिटेशन ओळखता यायला हवीत. आपणच आपल्याला संधी देणे महत्त्वाचं. पेशन्स आणि अॅडजस्टमेंट यांच्यांशी मैत्री केल्यावर एकटेपण जवळ फिरकत नाही, असं त्यांचं मत.

थोडक्यात काय... स्वत:वर पूर्ण विश्वास ठेवत, आयुष्याकडून मला काय हवंय याची खूणगाठ मनाशी पक्की ठेवून या महानगरीत पाऊल ठेवलंत की ती तुम्हाला नक्की आपलसं करते. आशा- निराशेच्या हिंदोळ्यांमध्ये अलगद पंखाखाली घेते... 'आय वाँट टू सरप्राइज मायसेल्फ एव्हरी डे' असं म्हणत गाढ झोप लागली की दुस-या दिवशी 'गुड मॉर्निंग मुंबै' म्हणणं सोपं होईल!

माझीया मनाला वाट सापडेना

ती इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला होती. त्यांचा सहा जणांचा ग्रुप होता. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षापासून ते सोबत होते. या सहा जणांचं झक्कास पटायचं. ते भन्नाट मस्ती करायचे. कितीही भांडणं झाली तरी ती काही क्षणात मिटायची. त्यांच्या कॉलेजमध्ये पुण्यातल्या एका नामांकित कंपनीचे कॅम्पस इंटरव्ह्यू आले होते. कंपनीनं आकर्षक पगार ऑफर केला होता. ग्रुपमधल्या सर्वांनी भरपूर मेहनत घेतली. परंतु, इंटरव्ह्युत त्यांच्या ग्रुपमधून फक्त तिचं सिलेक्‍शन झालं. सिलेक्‍शन झाल्यानं एकीकडे ती प्रचंड आनंदी होती तर ग्रुपमधले सगळे रिजेक्‍ट झाल्याचं सोबत तेवढंच दुःखही होतं. नोकरीच्या निमित्तानं त्यांचा ग्रुप बराचसा विभक्त होणार होता. ग्रुपमधल्या इतरांना नाकारल्या गेल्याची रुखरुख भोळ्या मनाला लागून राहिली होती. तरीही निवडल्या गेल्याचा आनंद अपार होता. कॉलेज संपल्याबरोबर कार्पोरेट कल्चरमध्ये काम करायला मिळेल, याचं समाधान मनाला मोहरून टाकत होतं. व्यक्तिमत्त्वाला लाभलेली यशाची झळाळी विलक्षण होती. कॉलेजमधल्या केवळ चार जणांचं या कंपनीत सिलेक्‍शन झालं होतं. याचा वर्गात वारंवार उल्लेख होत होता. भर वर्गात मॅडमची शाबासकी गौरवान्वित करीत होती. ओतप्रोत अभिमानानं ऊर भरून निघत होता. आपल्या मेहनतीचं फळ मिळालं, याचं समाधान मनात दाटलं होतं. स्वतःवरचा विश्‍वास द्विगुणित झाला होता. सिलेक्‍शनच्या आनंदानं ती अगदी "सातवे आसमानपर' होती, असं म्हटलं तरी चालेल.

बघता बघता कॉलेज संपलं. कंपनी जॉईन करण्याची डेट जवळ आली. तशी मनाला हुरहूर लागली. आपण कुठे कमी पडणार तर नाही ना... असा विचार सारखा छळत होता. कंपनी जॉईनींगचे सोपस्कार पार पडले. प्रशिक्षणाला सुरवात झाली. त्यांच्या लहान लहान टीम तयार करण्यात आल्या. तिच्या कॉलेजमध्ये असलेल्या मुलांचा समावेश एक दुसऱ्या टीममध्ये होता. तिच्या टीममधले सगळेच तिला अनोळखी होते. हळूहळू ओळख मुरत गेली. काही दिवसांनी त्यांचा एक स्वतंत्र असा ग्रुप तयार झाला. या ग्रुपमधील सुहास नावाचा मुलगा तिला कामात खूप मदत करायचा. दोघांचं मस्त जमायचं. तो जेवढा देखणा तेवढाच हुशारही होता. एखादं काम पटदिशी हातावेगळं करण्याचं कसब त्यात होतं. तिला त्याची वारंवार मदत लागायची. तोही मदतीला कायम तत्पर असायचा.

परंतु, कंपनीत हिटलर म्हणून ओळखला जाणारा टीम लिडर दुर्दैवानं त्यांच्या टीमचा बॉस झाला. वयानं तो फारसा मोठा नसला तरी बऱ्यापैकी सिनिअर होता. तो प्रचंड तापट स्वभावाचा आणि कामात तर अगदी सैनिकी शिस्तीचा होता. त्याच्या हाताखाली काम करणं म्हणजे हिटलरच्या एखाद्या छळछावणीत काम करण्यासारखं महाकठीण काम होतं. त्यानं अगदी काही दिवसांत टीममधल्या सगळ्या सहकाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं. एखादं काम दिलं की ते डेडलाईनच्या आधीच पूर्ण व्हायला हवं असं त्याचा अट्टहास असायचा. कामात चूक झाली किंवा दिरंगाई झाली की त्याच्या तिखट रागाला सामोरं जावं लागायचं.

एकदा तिच्या हातून अगदी फुटकळ स्वरूपाची चूक झाली. यावर टीम लिडरनं तिचा चांगलं फैलावर घेतलं. प्रथम त्याच्या केबिनमध्ये आणि नंतर संपूर्ण टीमसमोर भीषण झापलं. आपण तिला सर्वांसमोर झापतोय याचं भानही ठेवलं नाही. ती पहिल्यांदाच एवढा संताप बघत होती, अनुभवत होती. आई-वडिलांनी अगदी गोजिऱ्या बाळासारखं तिला वाढवलं होतं. तिला ते कधी मोठ्या आवाजातही बोलत नसत. पण या टीम लिडरनं अगदी कडक-बोचऱ्या शब्दांमध्ये सुनावलं. त्यामुळे ती प्रचंड घाबरली, बावरली. चांगलीच भेदरली. तिला साधा शब्दही फुटत नव्हता. डोळ्यांतून निरंतर धारा वाहू लागल्या. ती छोट्याशा रुमालानं अश्रू टिपण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागली. तरी त्याचं रागावणं जराही ओसरलं नाही. तिच्या अंगाला कापरं फुटलं. थोड्या वेळानं टीम लिडर त्याच्या केबिनमध्ये तावातावानं परतला. त्यानंतर सहकारी तिच्याभोवती गोळा झाले. तिला आपल्या परीनं समाजावू लागले. सहकाऱ्यांचं प्रेम बघून तिला पुन्हा रडू कोसळलं. डेस्कवर डोकं ठेवून ती भावनांचं मळभ दूर करू लागली. शेवटी सुहास पुढे सरसावला. त्यानं तिची समजूत घातली, आधार दिला. जरा वेळानं तिनंही स्वतःला सावरलं. त्या दिवशी तिचं कामात मुळीच लक्ष लागत नव्हतं. लंचब्रेक झाल्यावर जरा मोकळा वेळ मिळाला.

""अरे काय हा हिटलर यार. याला जराही अक्कल नाही. कामाशिवाय याला काहीच कसं दिसत नाही! अरे माणुसकी नावाचा काही प्रकार असतो की नाही! याला माणूस म्हणायलाच नको. कामात हा अगदी जनावर आहे. मनात जराही दया-माया नाही. आपले ज्युनिअर ही माणसं आहेत याची जराही जाण नाही. अगदी यंत्रांसारखं राब राब राबवून घेतो. चूक झाली तर बोचऱ्या शब्दांचे फटके देतो. पूर्वीच्या काळी गुलाम नावाची जी पद्धत होती तशीच आपली अवस्था झाली आहे. आम्ही याचे गुलाम आणि हा आमचा मुकादम...!'' सुहासनं चर्चेला सुरवात केली. रिसेसची वेळ झाल्यानं सगळे कॅन्टीनमध्ये जमले होते. ती तर अजूनही शांत होती. तिचा अगदी पुतळा झाला होता.

""होय रे, अगदी बरोबर बोललास. परवा मलाही त्यानं कसलं झापलं म्हणून सांगू... अरे क्षुल्लक चूक होती. पण नाही. चूक करायची नाही म्हणजे नाही. त्याला ना शंभर टक्के परफेक्‍शन लागतं. हा स्वतः तरी शंभर टक्के परफेक्‍ट आहे का? नाही ना. मग दुसऱ्यांकडून मोठमोठ्या अपेक्षा कशाला बागळतो, ते काही कळत नाही. राक्षस आहे लेकाचा. गेल्या जन्मी नक्कीच असूर असेल. आणि पुढचे दहा जन्मही असूरच राहील.'' त्यांच्या ग्रुपमधला विशाल बोलत होता.

""याला ना, आपण चांगला धडा शिकवायला हवा. तेव्हाच याचं टाळकं जागेवर येईल. याच्या ना, खुर्चीचा एक पायच मोडून ठेवायचा. म्हणजे हा बसायला गेला की धाडकन आपटेल. आणि सगळं हसं होईल. नको त्यापेक्षा ना, याच्या खुर्चीत एखादी टाचणी टोचून ठेवायची. म्हणजे हा चांगला विव्हळेल. पण अरे... या सगळ्या जुनाट कल्पना झाल्या. आपण कॉम्प्युटरच्या जगात वावरणारे आहेत. आपण काहीतरी वेगळं करायला हवं. याच्या कॉम्प्युटरमध्ये ना, डेडली व्हायरस टाकायला हवा. याच्या सगळ्या महत्त्वाच्या फाईल्स करप्ट झाल्या ना, की खरी अद्दल घडेल. किंवा यापेक्षा एक भन्नाट कल्पना आहे. याच्या किबोर्डवर ना, बेडूक सोडायचा. हा किबोर्ड बाहेर काढायला गेला की बेडूक याच्या टायवर उडी मारेल. कसला घाबरेल ना हा तेव्हा... कित्ती मजा येईल ना.'' सईच्या क्रियेटीव्ह माईंडमधून एकावर एक आयडियाज येत होत्या. त्यावर सगळे पोट धरून हसत होते. बेडकाची आयडिया ऐकून तर तिलाही हसू फुटलं. ती गालातल्या गालात हसू आवरू लागली.

""सई, तू म्हणते तसं करता येईल. पण जरा शांत डोक्‍यानं विचार करा. कंपनीला आपलं कारस्थान कळालं तर आपल्याला अगदी दोन सेकंदात कंपनीतून काढून टाकतील. सोबत आपल्या रिझ्युमवर आपल्या अतुलनीय कामगिरीचा ठसा उमटवतील. आपलं सगळं करिअर बरबाद होईल. मित्रांनो, आपण असं मुळीच करायला नको.'' संजोग अगदी समजूतदारपणे म्हणाला. ही चर्चा अशीच सुरू राहिली. पण त्यातून काही तोडगा निघाला नाही. थोड्या वेळानं पुन्हा काम सुरू झालं. तिनंही मनातल्या रागावर नियंत्रण मिळवून काम पूर्ण करून दिलं. आता टीम लिडर विषयी मनात प्रचंड संताप खदखदत होता. ती त्याचा प्रचंड तिरस्कार करू लागली होती.

त्या दिवसापासून ती प्रचंड सांभाळून काम करू लागली. कामात जराही चूक होऊ देत नव्हती. परंतु, एक दिवस तिच्या हातून चूक झालीच. तिला लागलीच टीम लिडरचा तापट चेहरा आठवला. अंगारा कापरं फुटलं. हृदयाची धडधड वाढली. आता तो आपल्याला जाम झाडणार, जराही गय करणार नाही, असे भीषण विचार एकापाठोपाठ एक धडकू लागले. ती अगदी खिंडीत सापडली.

तेवढ्यात लंचब्रेक झाला. डिफेन्स करायला तेवढाच वेळ मिळाला. ती त्या विचारांमध्येच कॅन्टीनमध्ये गेली. सोबत सुहास होता. तो म्हणाला, आज मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. आपण स्वतंत्र टेबलावर बसायचं का? तिलाही त्याच्याशी बोलायचं होतं. झालेली चूक त्याला सांगायची होती. त्यावर काही मार्ग निघतो का, पळवाट सापडते का या शक्‍यतेवर विचार करायचा होता. दोघं जेवायला टीमपासून वेगळे बसले. तसा सुहास बोलू लागला.
""गेल्या काही दिवसांपासून तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. पण हिंमत होत नव्हती. आपण छान मित्र आहोत. आपलं चांगलं जमतं. तुलाही माझ्यासोबत वेळ घालवायला आवडतो. आपण एकमेकांना सगळी मदत करतो. सोबत आपण एकाच कंपनीत काम करतोय. आपलं एकमेकांच्या घरी जाणं-येणंही आहे. माझ्या आई-बाबांना तुझा स्वभाव आवडतो. मलाही आता तुझ्या स्वभाव... म्हणजे तू आवडतेस. मला जशी पत्नी हवी होती तू तशीच आहेस. तू माझ्याशी लग्न करशील...?''



**********************************************************************

""खरंच ग! मला तू खूप आवडतेस. तुझा मनमिळाऊ स्वभाव, इतरांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती सहज आपलंस करून जाते. तुझा आवाज तर अगदी मधापेक्षा मधुर आहे. एकदा का तुझा आवाज ऐकला की तो ऐकतच राहावा असं वाटतं. तो हळूवार ध्वनी कानात निरंतर गुंजत राहतो. आता तर माझं तुझ्यावर एवढं प्रेम जडलंय की तू सोबत नसतानाही सोबत असतेस. ध्यानी-मनी-स्वप्नी तुझाच वास असतो. प्लीज नाही म्हणू नकोस. माझं तुझ्यावर फार फार प्रेम आहे.'' सुहास अगदी जीव ओतून बोलत होता. पण तिचं त्याच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर टीम लिडरचा कातावलेला चेहरा झळकत होता. आपल्याला तो जाम रागावणार आहे याची मनात धास्ती होती. परंतु, सुहास जे काही बोलत होता त्याचा अर्थ समजत होता. त्यानं प्रपोज केलंय हे उमगलं होतं. एकाचवेळी दोन वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड देत असल्याने मनात विचारांची कोंडी झाली होती. त्यातून मार्ग सापडत नव्हता. चलबिचलता क्षणाक्षणाला वाढत होती. अस्वस्थतेनं जागा व्यापली होती.

तेवढ्यात सुहास म्हणाला,""अगं हरकत नाही. तू जरा विचार करून निर्णय दिलास तरी चालेल. मला आताच घाईत दिलेलं उत्तर अपेक्षित नाहीए. उलट तू एवढा मोठा निर्णय विचार करूनच द्यावा असं मला वाटतं. काहीही झालं तरी हा आपल्या आयुष्यभराचा निर्णय आहे. तो एवढा सहज थोडाच घेता येईल.''
तिला पळवाट सापडली. तिनं सुहासला विचार करून सांगते असं सांगितलं. तेवढ्यात त्यांचा टीम लिडर कॅन्टीनमध्ये आला. आजूबाजूला कटाक्ष टाकून थेट स्वयंपाक खोलीत घुसला. स्वयंपाक्‍याला मदत करायला असलेल्या म्हताऱ्यासोबत बोलू लागला. टीम लिडरचं तसं कंपनीत कुणाशीच पटत नव्हतं. तो कायम एकटा राहायचा. कॅन्टीनमध्ये एकटाच जेवायचा. परंतु, म्हाताऱ्यासोबत बोलताना त्याला तिनं बऱ्याच वेळा बघितलं होतं. तिच्या मनात शंका उमटली. तिनं सुहासजवळ ती व्यक्त केली.

""मलाही फारसं माहीत नाही गं... पण मीसुद्धा आपल्या बॉसला बऱ्याच वेळा त्या म्हाताऱ्यासोबत बोलताना बघितलंय. मलाही सुरवातीला याचं आश्‍चर्य वाटलं होतं. नंतर मी विचार करणं सोडून दिलं. आधीच आपल्या आयुष्यात काय कमी संकटं आहेत... डिटेक्‍टीव्हशीप करायला वेळ तरी आहे का आपल्याकडे... पण एक मात्र खरं, ते म्हणजे आपल्या बॉसचं कंपनीत कुणाशीच पटत नाही. सगळ्यांशी तो भांडत असतो. पण त्या म्हाताऱ्याशी त्याचं चांगलं जमतं. देवच जाणो, काय प्रकरण आहे ते... '' सुहासच्या मनातही शंका आली होती.

कॅन्टीनमधून टीम लिडर गेल्यावर ती स्वयंपाक खोलीत गेली. तिथं तो म्हातारा खाली जमिनीवर बसून आमटी-राइस खात होता. तो कमालीचा हळकूळा दिसत होता. जेवताना त्याचा उजवा हात थरथर कापत होता. वयानं तो 60-65 च्या घरात असावा. तिला बघून तो बावरलाच. कारण कंपनीचे कर्मचारी सहसा स्वयंपाक खोलीत येत नसत. आपल्या हातून काही चूक झाली असेल, असा त्याचा समज झाला.

""सॉरी मॅडम. काही चूक झाली असेल तर मला माफ करा. म्हातारपणामुळे कधी कधी हातून नकळत काही चूक होते. मी तसा मुद्दाम काहीच करत नाही. आणि या कॅन्टीनमध्ये कामही भरपूर असतं. भांडे घासणं, त्यानंतर भाजी चिरून देणं, आणि बरीच काही कामं मागे लागतात. काही चुकीचं घडलं असेल तर प्लीज ते मनावर घेऊ नका. माझी तक्रार करू नका.'' आमटी-राइसचं ताट जमिनीवर ठेवून आजूबाजूच्या वस्तूंचा आधार घेत म्हातारा उठला. हात जोडून माफी मागू लागला. अगदी काकुळतीला येऊन गयावया करू लागला. तिला वरमल्यासारखं झालं.

""नाही हो बाबा. तसं काहीच नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी एका दुसऱ्या कारणासाठी स्वयंपाक खोलीत आले. मला एक सांगा... आमच्या बॉसचं आणि तुमचं कसं काय जमतं. तो स्वभावानं अगदी खडूस आहे. त्याचं कुणासोबतच पटत नाही. तुम्ही कसे काय त्याला सहन करता. उलट तो तुमच्याशी चांगला हसून, आदरानं बोलतो. हे कोडं मला काही उलगडलं नाही. म्हणून मी तुमच्याकडे आले...'' तिनं लागलीच खुलासा केला.

""नाही गं पोरी... मी तुला पोरी म्हटलं तर चालेल ना...!''
""हो. काही प्रॉब्लेम नाही.''

""मी जवळपास 3-4 वर्षांपासून या कॅन्टीनमध्ये काम करतोय. आतापर्यंत 4-5 कॅन्टीनमध्ये काम केलंय. काही वर्षांपूर्वी मी एका कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये कामाला होतो. त्या कॉलेजमध्ये तुमचा बॉस शिकायला होता. तेव्हाची त्याचा स्वभाव असाच होता. कुणाशी बोलायचा नाही की कुणासोबत संबंध ठेवायचा नाही. शिवाय तापट स्वभाव असल्यानं कुणीच त्याला जवळ करीत नव्हतं. शेवटी एक दिवस मीच त्याच्याशी बोलता झालो. तेव्हा त्याच्या घरचा सगळा इतिहास कळाला...''

""तो लहान असतानाच त्याचे वडील वारले. त्यानंतर आईनं दुसरं लग्न केलं. त्याच्या नवीन वडिलांना आधीच दोन मुलं होते. ते त्याच्याशी फार फटकून वागत. नवीन वडील कायम शिस्त शिकवत. आईनं जोडलेलं नवीन नातं हळूहळू खटकू लागलं होतं. त्याच्याच गोजिऱ्या घरात त्याचा जीव घूटमळू लागला होता. त्याची चिडचिड वाढली. तरीही कुणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. कालांतरानं तो अबोल आणि प्रचंड तापट झाला. तो त्याच्याच खोलीत वेळ घालवू लागला. इतरांशी त्याची भांडणं होऊ लागली. पण तो अभ्यासात प्रचंड हुशार होता. कॉलेजमध्येच असताना त्याला नोकरी लागली. नोकरी लागल्यावर त्यानं घर सोडलं, ते कायमचंच. कंपनीच्या कामात प्रचंड डेडिकेशन दाखविल्यानं त्याला टीम लिडर करण्यात आलं. कंपनीचं कोणतंही काम तो डेडलाईनच्या आधीच आणि अगदी परफेक्‍ट करून देत असल्यानं कंपनीनं त्याच्या फटकळ स्वभावाकडे सोईस्कर दुर्लक्ष केलं. इतरांनी केलेल्या तक्रारींवर ऍक्‍शन न घेता फक्त वेळोवेळी समज दिली.''

""पण विश्‍वास ठेव. त्याचा स्वभाव अगदी फणसासारखा आहे. वरवर प्रचंड तापट तर आत कमालीचा हळवा, मधुर आणि अगदी लहान मुलासारखा भाबडा. माझ्यासाठी तर तो देवाचंच रूप आहे. मला कामाचे चार एक हजार मिळतात. माझा मुलगा ऑटो चालवतो. त्याचीही कमाई मोजकीच आहे. माझा नातू अभ्यासात खूप हुशार आहे. परंतु, त्याला शिकवण्याइतपत आमच्याकडे पैसे नाहीत. तुमच्या टीम लिडरला हे कळाल्यावर त्यानं मला मदत केली. माझ्या नातवाच्या अभ्यासाचा संपूर्ण खर्च उचलला. या जगात कुणी कुणाला आण्याची मदत करीत नाही. त्यानं तर माझ्या नातवावर लाखो रुपये अगदी सहज खर्च केले. तो खरंच परमेश्‍वराचं रूप आहे.''

""पण परमेश्‍वरसुद्धा आपल्या अनुयायांची कायम कठीण परीक्षा घेत असतो. त्यांच्यावर संकटांचा सातत्यानं मारा करीत असतो. दोन वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं. चांगली सोन्यासारखी बायको मिळाली. त्याचा तिच्यावर खूप जीव होता. तिला तो कधीच दुखवत नव्हता. त्याच्या साचलेल्या आयुष्यात हळूवार प्रेमाची गुलाबी पहाट झाली होती. पण दुर्दैव आड आलं. पहिल्या बाळंतपणात बाळही गेलं आणि तीही गेली. तेव्हापासून त्याचा स्वभाव कमालीचा तापट झालाए. आता तर तो सारखा चिडत असतो. मी तर असं ऐकलंय की कंपनी त्याच्यावर स्ट्रीक्‍ट ऍक्‍शन घेणार आहे. पण तो तसा नाहीए. कंपनीनं त्याला समजून घेतलं पाहिजे.''

म्हाताऱ्यानं त्याचा सगळा इतिहास पालथा केला. थोड्या वेळानं लंच ब्रेक संपला. ती ऑफिसमध्ये आपल्या जागी येऊन बसली. तिच्या मनात म्हाताऱ्यानं सांगितलेली हकिगत घोळत होती. सखोल विचार करायला लावत होती. एवढ्यात त्या बॉसनं तिला केबिनमध्ये बोलवलं. तिच्या हातून चूक झाल्याचं त्याला समजलं होतं. त्यानं बोचऱ्या शब्दांत झापायला सुरवात केली. परंतु, यावेळी ती घाबरली नाही की बावरली नाही. डोळ्यांत जराही पाणी तरारलं नाही. उलट तिच्या मनात त्याच्याविषयी कमालीची सहानुभूती उमटत होती. तिला त्याचं भळभळणारं मन समजलं होतं... त्याचं दुःख आपलंसं झालं होतं...

****************************************************************************

तिला बॉसच्या चिडखोर स्वभावामागचं मूळ कारण गवसलं होतं. त्यावर ती निरंतर विचार करीत होती. पण कोणताच समाधानकारक उपाय सापडत नव्हता. विचारांच्या कित्येक फेऱ्या झाल्या तरी हाती कडवट निराशा पडत होती. विचार करून करून डोक्‍याचा अगदी भुगा झाला होता. काही दिवसांपासून डोक्‍यात तेच ते विचार घोळत असल्याने कशातच मन लागत नव्हतं. पण ऑफिसच्या कामात तिनं कुचराई केली नाही. अन्यथा पुन्हा बॉसच्या तिखट रागाला सामोरं जावं लागलं असतं. दुसरीकडे, सुहासची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्याच्या प्रश्‍नार्थक नजरा दररोज उत्तर शोधत होत्या. त्याच्या मनातील घालमेल नकळत साद घालत होती. त्याच्याशी बोलताना आता तिला आपलीच लाज वाटू लागली. आपण त्याला कित्येक दिवसांपासून केवळ टांगून ठेवलंय याचा अनावर संताप येत होता. पण करणार तरी काय? सध्या तिचीच मानसिकता स्थिर नव्हती. अशा पराकोटीच्या द्विधा मनःस्थितीत तिला आयुष्यभराचा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा नव्हता.

एक दिवस तिनं ठरवलं की याचा सोक्षमोक्ष लावायचाच. काहीतरी ठोस निर्णय घ्यायचाच. रात्रीचं जेवण आटोपल्यावर ती आपल्या खोलीत बिछ्यान्यावर बसून राहिली. तिच्या बाजूला टेबलावर असलेला लॅम्प खोलीतला काळोख दूर करण्याचा नेटानं प्रयत्न करीत होता. घड्याळाची टिकटिक रात्रीची नीरव शांतता हळुवारपणे कुरतडत होती. काळ संथ गतीनं पुढे सरकत होता. ती मात्र अगदी स्थितप्रज्ञ होती. डोक्‍यातील अवजड विचार विचारशक्तीला सुन्न करीत होते. एवढ्यात तिचं मन बोलतं झालं.

""खरंच कुणाच्या आयुष्यात कोणती संकटं असतील याची जराही कल्पना आपल्याला नसते. एखाद्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यावरून आपण त्याच्याविषयी आपलं मत बनवत असतो. पण जरा खोलात जाऊन बघितलं तर त्याच माणसाचा एक वेगळाच चेहरा समोर येतो. कधी कधी तो चेहरा अंतर्मुख करून जातो. तर कधी तो अत्यंत भयावह असतो. खरंच आपण जे म्हणतो की मला माणसांची पारख आहे, ते कितपत खरं असतं! वागण्या-बोलण्यातून एखाद्या माणसाची आपण पारख करू शकतो का? नाही कधीच नाही...''

""आता आमच्या टीम लिडरचंच उदाहरण घेतलं तर त्यानं लहानपणापासून कितीतरी संकट फेस केली आहेत. आयुष्यात उद्‌भवलेल्या संकटांची छाप हळव्या मनावर पडल्याने त्याच्या स्वभाव अत्यंत रुक्ष झालाय. स्वभावातील काटेरीपणामुळे त्याच्याशी कुणी संबंध ठेवत नाही. त्याला कायम नावं ठेवतात. पण तो दिसतो तसा नाहीए. मुळात त्याचा स्वभाव खूप चांगला आहे. तो इतरांना मदत करणारा आहे. त्याला कुणीतरी समजून घेणारं हवंय. त्याला कुणीतरी आपलं हवंय. त्याला चांगली साथ मिळाली तर त्याच्या आयुष्याला नवसंजीवनी मिळेल. नुकत्याच फुललेल्या कोमल कळीसारखं ते हळुवारपणे बहरेल. त्या सुवासानं दोघांचं आयुष्य खऱ्या अर्थानं मोहरून उठेल. खरंच, त्याला एखाद्या समजूतदार जोडीदाराची नितांत गरज आहे. हे त्याला समजत नसलं तरी मला त्याच्या वागण्यावर हाच एक उपाय दिसून येतोय.'' विचारचक्र काही केल्या खंडित होत नव्हतं.

""मी त्या जोडीदाराची भूमिका यशस्वीपणे वठवू शकले का? त्याला आ जन्म साथ देऊ शकेल का? त्याच्यावर निरंतर प्रेम करू शकेल का? माहीत नाही... म्हणजे अजून तसा निर्णय घेणं कदाचित कठीण आहे. पण एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सावरण्यासाठी त्याच्याशी थेट लग्न करायचं हे कितपत योग्य आहे...! मला त्याच्या परिस्थितीची जाणीव आहे. त्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी शक्‍य ते करण्याची तयारी आहे. मला त्याच्याबद्दल कमालीची सहानुभूती वाटते. आपण काहीतरी करायला हवं असं मन याचना करतं. कारण मी त्याच्यातील माणूस बघितला आहे. त्या अबोल माणसाला पुनरुज्जीवित करण्यासाठी माझी धडपड सुरू आहे. पण त्यासाठी त्याच्याशी लग्न करणं हे जरा धाडसाचं वाटतं. एखाद्या माणसात बदल करण्यासाठी त्याच्याशी थेट लग्न करायचं हा जरा टोकाचा निर्णय वाटतो. सहानुभूती आणि प्रेमात जरा अंतर आहे. त्याचाही मी जरा विचार करायला हवा.'' तिच्या समजूतदार मनात आलं.

""पण एक मात्र खरं. तो माणूस म्हणून चांगला आहे. लग्नासाठी त्याचा विचार करता येऊ शकतो. पण हेही खरं की माझं त्याच्यावर प्रेम नाही. त्याच्याविषयी सहानुभूती वाटते म्हणून मी असा विचार करीत आहे. त्याचा स्वभाव चांगला असल्यानं अगदी लग्नाचा विचार करण्यापर्यंत विचारांची मजल गेली आहे. पण त्याचं आधीच एक लग्न झालंय. या लग्नाला माझे आई-वडील नक्कीच विरोध करतीय. या शिवाय नातलग आणि समाजही माझ्या विरोधात जाईल...'' तिनं जरा प्रॅक्‍टिकल विचार केला.

""सुहासनं मला प्रपोज केलंय. त्याला माझे आई-वडील ओळखतात. शिवाय त्याच्या आई-वडिलांना माझा स्वभाव आवडतो. तो कायम मला कामात मदत करतो. मला काय हवं काय नको याची आस्थेनं चौकशी करतो. मलाही त्याचा स्वभाव आवडतो. आमच्या हॉबीज, प्रॉयॉरिटीज, स्टेट्‌स एकसारखं आहे. तो दिसायला जरा गव्हाळ रंगाचा असला तरी त्याचं मन स्वच्छ आणि निर्मळ आहे. मी सुहासकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मी त्याच्या प्रपोजचा गांभीर्यानं विचार करायला हवा.'' विचारांची अनेक आवर्तनं झाली. शेवटी तिनं निर्णय घेतला. त्यावर ठाम राहण्याचा दृढ निश्‍चय केला.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर लंचब्रेकमध्ये तिनं सुहासला गाठलं. काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय, असं कारण सांगून कॅन्टीनमधला मोकळा टेबल शोधला. सुहासला कळून चुकलं की आता परीक्षेची वेळ समोर येऊन ठेपली आहे. तिच्या उत्तरावर आपलं भावी आयुष्य अवलंबून आहे. त्याच्या मनात कमालीची घालमेल सुरू झाली. तिच्या उत्तरावर बेतलेली परिस्थिती ताडण्यासाठी मनाची अनामिक धावाधाव सुरू झाली. सुहास अगदी शांत झाला. त्यानं तिला बोलायला मोकळा वेळ दिला. आज त्याला केवळ तिचा निर्णय ऐकायचा होता. त्या निर्णयावरून त्याच्या प्रेमाचा फैसला होणार होता. ती बोलू लागली.
""सुहास तू माझा चांगला मित्र आहेस. तुझी मैत्री मी कायम गृहीत धरते. तुझा मला मोठा आधार आहे. कधीही एकटं वाटलं तरी तुझा भक्कम पाठिंबा मनाला उभारी देतो. म्हणून मी तुझ्याशी बोलण्याचा निर्णय घेतलाय. आपला बॉस दिसतो तसा नाहीए. त्याच्या आयुष्यात काय घडलंय हे मी कालच तुला सांगितलंय. आयुष्यात आलेल्या भीषण संकटांमुळे तो चिडखोर झालाय. त्याला बदलण्याची गरज आहे. त्याला कुणाची तरी साथ हवी आहे. आणि मला वाटतं, मी त्याला मदत करायला हवी. त्याची संकटं दूर करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मला त्याची अशी परिस्थिती बघवत नाहीए. तुला माहीत आहे मी किती हळवी आहे. असं काही विचित्र दिसलं की मी लगेच अंतर्मुख होते. त्याच्या गांभीर्यानं विचार करते. प्लीज मला समजून घे.'' तिच्या बोलण्याचा काहीएक अर्थ निघत नव्हता. सुहास अजूनही शांतच होता.

""सुहास आपण दोघांनी मिळून त्याला मदत करायची का? त्याला सावरण्यास हातभार लावायचा का? आपण पुढाकार घेतला नाही तर तो आयुष्यभर असाच राहील. उलट त्यातील रानटीपणा अधिक उग्र होत जाईल. त्याला कंपनीतून काढून टाकतील. त्यानंतर त्याला कुणीच नोकरीवर घेणार नाही. कारण प्रत्येकाला त्याचा विक्षिप्त स्वभाव माहीत असेल. आपण त्याला मदत करूयात का?'' तिनं एकावर एक प्रश्‍नांचा सरी भरल्या.

""हो. मी तुला साथ देईल. त्याला पुन्हा उभं करण्यात हवी ती मदत करेल. आणि प्लीज माझ्या मैत्रीच्या दबावाखाली येऊन काही निर्णय घेऊ नकोस. तू मला "हो' म्हटलं किंवा "नाही' म्हटलं तरी मी तुला मदत करेल. माझी तयारी आहे तशी. तू निश्‍चिंत राहा.'' सुहासनं खुलासा केला.

""अरे वेड्या, तू पण ना... खरच कलंदर आहेस. बरं कान देऊन ऐक, मी काय म्हणतेय ते... आय.. लव्ह.. यू.. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. मला तू खूप आवडतोस. कारण मला तू समजून घेतो. माझ्या मनातल्या भावना जाणतोस. मला तुझी जन्मभराची साथ करायची आहे. तुला भरभरून प्रेम द्यायचं आहे. आय लव्ह यू लॉट... फॉर एव्हर...'' ती एका श्‍वासात बोलली.

सुहासचा कोमेजलेला चेहरा फुलला. मनातील शंकेची जळमटं दूर झाली. अनावर आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. अंगात अनामिक ऊर्जा संचारली. डोळ्यांत नवस्वप्नांनी भरारी मारली. त्यानं हाताची उजवी मूठ वळून "येसऽऽऽऽ आय गॉट इट. आय ऍम डॅम लकी गाय.' असं म्हणत जल्लोष केला. त्याला तिची साथ लाभली. आयुष्यभराची.

(समाप्त)

गोष्ट एका प्रेमाची (तो आणि ती)

तो मूळचा सांगलीचा. इंजिनिअरिंग पूर्ण करून नुकताच पुण्याला आलेला. नोकरी शोधण्याच्या निमित्तानं चुलत भावाकडे तो राहत होता. त्याची दिवसाची सुरवात वेगवेगळ्या कंपन्यांच्या ऑनलाइन ऍडरेसेसवर ई-मेल पाठवून होत होती. तर दुपारचा वेळ मेल्सवर मिळालेल्या प्रतिसादावर आधारित इंटरव्ह्यूज अटेंड करण्यात जायचा. बरेच दिवस होऊनही समाधानकारक यश मिळत नव्हतं. त्यामुळे तो थोडा हताश, निराश दिसत होता. रिकाम्या हातांनी गावी परतावं की नोकरीसाठी नेटानं प्रयत्न करीत राहावं अशा द्विधा मनःस्थितीत तो अडकला होता. गावी परत जाणं ही एक सोईस्कर पळवाट असली तरी ती स्वाभिमानी मनाला पटणारी नव्हती. एकदा मनात बेत पक्का केल्यावर माघार घेणार तो गडी नव्हता. पण नोकरी मिळत नसल्यानं आत्मविश्‍वास कणाकणानं खंगत होता. दिवसागणिक मन मावळत होतं. उमेद सरत आली होती. सर्वत्र विषण्णता फोफावत होती. या शहरात सर्वांना नोकऱ्या आहेत. केवळ मलाच नोकरी मिळत नाही, अशी धारणा मनात जन्म घेत होती. विलक्षण घडामोडींच्या या जगात आपण कोणत्याच कामाचे नाहीत, असा निराशावादी भाव प्रकटत होता. सोबत घरून आणलेले पैसे आता सरत आले होते. आणखी काही दिवस पुण्यात राहणं आर्थिकदृष्टया परवडणारं नव्हतं. चुलत भावाला पैसे मागावे असा विचार मनात डोकावत होता. पैसे मागितल्यावर चुलत भावाने नकार देण्याची शक्‍यता धूसर होती. पण त्यानं आजवर कधीच कुणाला पैसे मागितले नव्हते. त्याला कुणाची उधारी करून ठेवायची मुळीच सवय नव्हती. त्यामुळे आहे त्या पैशांमध्ये काटकसर करून तो राहत होता. नोकरीसाठी जिवाचा आटापिटा करीत होता.

चुलत भावाचा फ्लॅट असलेल्या अपार्टमेंटमध्ये एक सुंदर मुलगी राहत होती. ती दिसायला जेवढी देखणी तेवढीच चुणचुणीत होती. कायम लेगिंग आणि कुर्त्यात वावरणारी ही मुलगी अगदी कुणीही बघताच तिच्या प्रेमात पडावं अशीच होती. ती फारशी बोलकी नसली तरी तिचे पाणीदार डोळे तेवढेच बोलके होते. तिचे डोळे कायम त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत. हा योगायोग होता की भ्रम याचा अजूनही त्यानं शोध घेतलेला नव्हता. मनाशी असलेली कल्पना अत्यंत सुखावह असल्यानं त्याला सत्यात पडायचंच नव्हतं. आहे त्या परिस्थितीत तो समाधानी होता. तिचा फ्लॅट चुलत भावाच्या फ्लॅटच्या नेमका शेजारी होता. या दोन्ही कुटुंबामध्ये अगदी जिव्हाळ्याचे संबंध नसले तरी माफक शेजारधर्म पाळला जात होता.

त्याला ती मुलगी मनापासून आवडली होती. तिला बघण्याची एकही संधी तो सोडत नव्हता. झाडांना पाणी देण्यासाठी ती गॅलरीत आली की तो मुद्दाम गॅलरीत जायचा. तिरक्‍या नजरेनं तिच्याकडे बघायचा. प्रत्येक क्षण मनात जपून ठेवायचा. रात्री झोपताना त्या क्षणांची उजळणी करायचा. त्या क्षणांमध्ये आयुष्य शोधायचा. आणि वेड्यासारखा गालातल्या गालात हळूवार हसायचा. उद्याची अगदी आतुरतेनं वाट बघायचा. आता तिची झाडांना पाणी देण्याची वेळ त्यानं अगदी मनाशी बांधली होती. ती येण्यापूर्वीच तो मुद्दाम गॅलरीत अभ्यास करीत बसायचा. इंजिनिअरिंग झाल्यावर तसा त्याला फारसा अभ्यास नव्हता. पण अभ्यास करीत असल्याचा बनाव करीत एखादं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा इंग्लिश स्पिकिंगचं पुस्तक डोळ्यांसमोर धरून ठेवायचा. तीही न चुकता वेळेवर गॅलरीत यायची. परत जाताना त्याच्यावर वरवर कटाक्ष टाकायची. तिनं त्याच्याकडे एकवार बघितलं तरी कित्येक तास वाट बघण्याचं फलित व्हायचं. पुन्हा पुन्हा वाट बघण्याची अनामिक ऊर्जा मनात संचारायची. पण गाडी केवळ तिला बघण्यावर थांबली होती. तिच्याशी बोलावं की नाही, असा अशक्‍य विचार छळत होता. तर दुसरीकडे, आपण पुण्यात नोकरी शोधायला आलोय, असं मन सारखं बजावीत होतं. पण तिला बघितल्याशिवाय मनातील अस्वस्थता जराही स्वस्थ होत नव्हती. त्याचा अगदी एका वेगळ्या भावविश्‍वात प्रवेश झाला होता. त्याचं वागणं, त्याचं बघणं त्याच्या हातात नव्हतंच मुळी, असं म्हटलं तरीही चालेल.

एक दिवस ती त्यांच्या घरी आली. तिच्या हातात कसलंसं एक मोठं खोलगट बाउल होतं. तिनं स्वतः तयार केलेलं फ्रुटसॅलड आणलं होतं. कदाचित खास त्याच्यासाठी!!! नको एवढा लांबचा अंदाज आताच बांधायला नको! त्याच्या उत्साही मनात येऊन गेलं. तिनं त्याच्या वहिनीला आवाज दिला. त्या किचनमध्ये काहीतरी काम करीत होत्या. त्यांनी त्याला कोण आलंय ते बघण्यास सांगितलं. तो ड्रॉइंग रूममध्ये आला. तिनं त्याच्या हातात बाउल दिलं. वहिनींसाठी फ्रुटसॅलड आणलंय, असं "मुद्दाम' सांगितलं. बाउल हातात घेताना तिच्या बोटांचा हलकासा स्पर्श झाला. त्यासरशी तो अगदी रोमारोमात शहारला. विजेचा हळूवार धक्का बसावा तसा तो स्पर्श सर्वांगात पसरला. हा स्पर्श फारच बोलका होता. तो जागेवरच उभा राहीला. जराही हालचाल न करता. भेटीचा प्रत्येक क्षण मनात साठवू लागला. बाउल देऊन ती परत गेली. पण त्याचं जग पुरतं स्तब्ध झालं होतं. काय करावं ते समजेना. थोड्या वेळात वहिनी आल्या. त्यांनी त्याला छेडलं. तसा तो भानावर आला. असे अनेक गमतीदार प्रसंग घडत होते. तसे दोघं एकमेकांमध्ये नकळत गुंफले जात होते. पण त्यातून काहीएक स्पष्ट होत नव्हतं. तिच्याशी बोलतं व्हावं की एवढ्यावरच समाधान मानावं, हा जीवघेणा प्रश्‍न सारखा छळत होता. नोकरी मिळविण्याच्या धडपडीपेक्षा एक वेगळंच विश्‍व त्याच्यावर स्वार झालं होतं. या विश्‍वानं पुरती मोहिनी घातली होती. त्याचं नाजूक हळवं मन कुठेतरी हरवलं होतं. काही केल्या ते सापडत नव्हतं. तो पुरता गोंधळला होता. वेडापिसा झाला होता. तिची मोहिनी सुटता सुटत नव्हती. उलट दिवसरात्र तीच ती दिसत होती. डोळे उघडे असोत वा बंद! तिचा वावर सारखा भासत होता. स्पर्श तेवढाच ताजा आणि बोलता होता.

एक दिवस पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी तो बेसमेंटमध्ये आला. तीही तेथेच होती. तिची गाडी सुरू होत नव्हती. तिनं त्याच्याकडे मदत मागणं क्रमप्राप्त होतं. पण त्याच्याकडूनही गाडी सुरू होईना. त्याचे अथक प्रयत्न अयशस्वी झाले. पण तिला बोलतं करण्यात तो यशस्वी झाला. दोघांची माफक ओळख झाली. याला मैत्रीची सुरवात म्हणता येईल कदाचित. आता ही मैत्री टिकवायची होती. अधिक दृढ करायची होती. कारण त्यावरच हळव्या भावनांचं इवलसं घरं साकारणार होतं. अधिक बळकट होणार होतं.



*********************************************************************************


""ए किती मस्त ना. हिरव्याकंच शेतात जायचं. पायवाट तुडवायची. नुकत्याच अंकूरलेल्या पिकांना हळूवार स्पर्श करायचा. पानांचा गारवा रोमरोमात दडवायचा. पाय दुखेपर्यंत हिंड हिंड हिंडायचं. शुद्ध हवा श्‍वासात साठवून ठेवायची. शहरी भाषेत म्हणायचं झालं तर शुद्ध ऑक्‍सिजन घ्यायचा. चुलीवर तयार केलेल्या पिठलं-भाकरीवर ताव मारायचा. विहिरीचं मधुर पाणी प्यायचं. आणि छान ढेकर देऊन झाडाच्या गारेगार सावलीत मस्त पडायचं. अगदी बिनधास्त. मनात काही विचार नाही की कसलं काही टेंशन नाही. आराम झाला की पुन्हा शेतात काही खायला मिळतंय का ते शोधायचं. खरंच किती मस्त वाटत असेल ना.'' ती बोलत होती. दोघांच्या ओळखीनं मूर्त रूप धारण केलं होतं. आता दोघं नित्यनियमानं सायंकाळी फ्लॅटच्या गच्चीवर भेटत. गप्पाटप्पा मारत. दिवसभरातील घडामोडींचा ऊहापोह करीत. आता विषयांचं दडपण राहिलं नव्हतं. गप्पा मारताना दोघांनाही विषय सुचत. ते उत्तरोत्तर फुलत जात. दोघांचं आणि दोघांसाठीचं इवलसं जग साकारत होतं. त्यात ते निरंतर गुंफत होते. अगदी अनामिक भावनांच्या साथीनं. मनात किंचितही किंतू-परंतु न ठेवता.

""अगं खरंच. आय जस्ट मीस माय दोज डेज. आमची ना सांगलीजवळ फार मोठी नाही, पण तीस एकर शेती आहे. बाबा नोकरीवर असल्यानं शेतीकडे लक्ष द्यायला तसं कुणी नाही. म्हणून चुलतेच शेती बघतात. वर्षातून एकदा किंवा दोनदा आम्ही गावी जातो. छान शेतीत फिरतो. खूप खूप मजा मारतो. एकदा का गावी गेलं ना, की असं वाटतं की सांगलीला परतूच नये. गावी असलेल्या घरीच राहावं. आमचं मूळ शेतीत असल्यानं शेतीची ओढ ही आमच्या रक्तात आहे. काही केल्या ती जात नाही. आपली शेती, आपलं पीक अशा गोष्टी कायम साद घालीत राहतात.'' शेतीचा विषय निघाल्यानं तो नकळत गावाकडच्या गप्पांनी मोहरून गेला होता. त्याचं मन काही सेकंदात शेतीच्या बंधाऱ्यापलिकडं गेलं होतं. तो पुन्हा बोलू लागला.

""तुझा विश्‍वास बसणार नाही, पण मी गावी गेलो की शेतात काम करतो. तुला वाटेल हा इंजिनिअर मुलगा. हा काय शेतात काम करणार... पण खरंच सांगतो. मजुरांना शेतात काम करताना बघून मलाही हुरूप चढतो. मग मला जमेल तशी कामं करतो. त्याचं खूप समाधान मिळतं. एक प्रकारची आंतरिक ऊर्जा मिळते. शहरात गेल्यावर हीच ऊर्जा सोबत असते.'' तो अगदी हरखल्यासारखा बोलत होता.

""अहो महाराज आता या पुण्यात. सिमेंट-कॉंक्रिटच्या जंगलात प्रवेश करा! मी समजू शकते रे तुझ्या भावना. पण शहर हे शहर असतं. याला स्वप्ननगरी म्हणतात. फ्लॅटमध्ये बसून मोठमोठी स्वप्नं बघायची. ती पूर्ण करण्यासाठी निरंतर झटायचं. अगदी जिवाचं रान करायचं. आणि ती स्वप्नं पूर्ण झाली की समाधानानं आपल्याच पाठीवर उबदार हात फिरवायचा. कारण आपलं कौतुक करायला, आपल्या आनंदात सहभागी व्हायला येथे हक्काचं असं कुणीच नसतं. आपणच आपलं सोबती. यालाच येथे "वे ऑफ लाइफ' असं गोंडस नाव दिलंय. नावं जेवढं मोठं तेवढंच दर्शन खोटं. येथे प्रत्येक क्षणात आनंद शोधायचा असतो. प्रत्येक आनंदात जीवन जगायचं असतं. जीवन जगताना चिमूटभर समाधान टिपायचं असतं. कारण दुःखाची परिसीमा अफाट आहे. त्यात आपण अगदी शुल्लक ठरतो.'' ती अचानक गप्पांमधून भरकटत गेली. अगदी पुराच्या पाण्यात कागदी नौका जाते तशी. पण तिनं स्वतःला लागलीच सावरलं. बाहेर सायंकाळची कातरवेळ सरून रात्रीचा काळोख संथ गतीनं भरारी घेत होता. गप्पांना आवरतं घेत दोघंही घरी परतले. तो दिवस दोघांसाठी तेव्हाच सरला.

असे दिवसांमागून दिसत जात होते. दोघांच्या आयुष्यातला हा सुवर्णकाळ होता. प्रत्येक दिवस महत्त्वाचा होता. दोघांनी सोबत घालविलेला प्रत्येक क्षण अमूल्य होता. काही दिवसांनी तिचा वाढदिवस आला. त्याला तिला काहीतरी खास भेट द्यायचं होतं. जे तिला कायम स्मरणात राहील असं काहीतरी. आणि जे कायम तिच्या सोबत, जवळ राहील. त्यानं आपल्या कल्पनाशक्तीच्या कक्षा रुंदावल्या. प्रचंड विचार केला. महागातले महाग गिफ्ट डोळ्यांसमोर प्रकटू लागले. पण खिशात मोजक्‍याच दमड्या होत्या. स्वस्त गिफ्ट मनाला पटत नव्हतं. स्वस्त काहीतरी देणे म्हणजे निव्वळ कामचलावूपणा आहे असं सारखं मन बजावत होतं. त्याला तर आयुष्यातलं सर्वांत अमूल्य असं आणि काहीतरी हटके गिफ्ट द्यायचं होतं. शेवटी मनाजोगं गिफ्ट आणि आर्थिक साथसंगतीचा ताळमेळ बसला. त्यानं छानशी एक गुलाबी वर्णाची, गुबगुबीत डॉल खरेदी केली. तिला गिफ्ट फार फार आवडलं. तिनं तसं बोलूनही दाखवलं. तिचा वाढदिवस सुखा-समाधानानं पार पडला. असे अनेक क्षण दोघांनी एन्जॉय केले. या प्रत्येक क्षणातील नाजूक धाग्यातून अनामिक नात्याची वीण घट्ट होत होती, अधिक बळकट होत होती.

एक दिवस त्याला झोप येईना. रात्रीचा एक वाजला होता. कसलासा विचार त्याला छळत होता. त्यानं टेबललॅम्प लावला. भावाचा टु-बिएचके फ्लॅट असल्यानं त्याला झोपायला स्वतंत्र खोली होती. खोलीत तो येरझाऱ्या घालू लागला. त्याचं मन माणामणाच्या दडपणाखाली पार दबलं होतं. अगदी कुस्करल्या गेलं होतं. त्यातून काही केल्या सुटका होत नव्हती. तो बेडवर बसला. पुन्हा विचार करू लागला.

""ती खूप छान आहे. ती दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढंच तिचं मन निर्मल आहे. मला ती मनापासून आवडते. माझ्या मनात जशी मुलगी होती ती तशीच आहे. ती मला समजून घेते. माझ्या भावना तिला कळतात. एक अनामिक नातं आमच्या दोघांत आहे. यालाच प्रेम म्हणतात. हे ठाऊक असलं तरी नकळत मनात भीषण शंका उमटतात. हळूहळू त्या दाट होत जातात. मग माझाच माझ्यावरचा विश्‍वास तुटत जातो. पण आय गेस, तिलाही मी आवडतो. परंतु, गेस करायला हा काही परीक्षेतील प्रश्‍न नाही. हा माझ्या आयुष्याचा प्रश्‍न आहे. तो योग्य रीतीनं हाताळला नाही तर मी एक चांगली मैत्रीण गमावून बसेल, त्याचं काय? नाही मी अत्यंत काळजीपूर्वक पावलं उचलायला हवी.'' तो पुरता विचारचक्रात अडकला होता. काही केल्या सुटका होत नव्हती.

""पण असं म्हणतात. प्रेम व्यक्त करायला उशीर करू नये. नाहीतर मनात भावना असतानाही काहीतरी भलतं सलतं होऊन बसतं. पण तसं बघितलं तर मी उशीर मुळीच करीत नाहीये. एकमेकांना समजून घेतल्याशिवाय, एकमेकांच्या भावना जाणून घेतल्याशिवाय कसं काय व्यक्त होणार? आततायीपणा धोक्‍याचं वळणंही ठरू शकतो. खरंच प्रेम हे किती क्‍नफ्युझिंग असतं. पुढे काय करावं ते काहीच समजत नाही.''

दुसरा दिवस उजाडला. पण दररोजप्रमाणे ती त्या दिवशी बाल्कनीत आली नाही. त्याला अगदी चुकल्या चुकल्या सारखं झालं. थोड्या वेळानं वहिनी काही कामानिमित्त तिच्या घरी जाऊन आल्या. आल्याबरोबर वहिनींनी त्याच्यावर अणुबॉम्बच टाकला. तिला बघायला आज पाहुणे येणार होते. तिच्या घरी पाहुण्यांच्या सरबराईची जय्यत तयारी सुरू होती. ही वार्ता कळताच तो अगदी गांगरून गेला. दुर्धर परीक्षेची वेळ अगदी नकळत समोर येऊन ठाकली होती...


*********************************************************************************

तिला पाहुणे बघायला येणार या कल्पनेनंच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. पाहुण्यांसमोर ती चहा आणि पोह्यांचा स्ट्रे घेऊन जात असल्याची दृश्‍यं नकळत डोळ्यांमध्ये खोलवर उमटत होती, कमालीची बोचत होती. ती केवळ माझीच आहे, फक्त माझी... अशी मनाची धारणा होऊ लागली होती. आपण प्रेम व्यक्त करायला फारच उशीर केला, मी आधीच व्यक्त व्हायला हवं होतं, हा उशीर मला नडणार तर नाही ना? असे भीषण विचार मनातला सोलून काढत होते. पण आता वाट बघण्याशिवाय कुठलाच मार्ग शिल्लक नव्हता. देवाच्या कृपेनं काही अघटित घडू नये अशी सारखी याचना सुरू होती. मनात दुसरा कुठलाच विचार शिरत नव्हता. त्याचं जग फक्त तिच्याभोवती फिरत होतं.

तो लागलीच गॅलरीत गेला. कसलंसं पुस्तक डोळ्यांसमोर ठेवून तिची वाट बघू लागला. दुपारी ती सहसा गॅलरीत येत नसे. पण त्याला आता धीरच राहिला नव्हता. ती कदाचित गॅलरीत येईल असा अशक्‍य विचार सारखा मनात डोकावत होता. ती काही कामानिमित्त जरी गॅलरीत आली तरी तिच्याशी किमान बोलता येईल, तिला काही विचारता येईल असं वाटत होतं. देवा तिला गॅलरीत पाठव अशी मनात निरंतर प्रार्थना सुरू होती. तो दुपारभर गॅलरीत बसून राहिला. साधं जेवणंही घेतलं नाही. पण ती काही आली नाही. शेवटी तो निराशेनंच घरात परतला.

त्या दिवशी त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. काय झालं असेल असं सारखं वाटत होतं. तेच ते विचार कमालीचे छळत होते. दररोज सायंकाळी ते दोघं फ्लॅटच्या गच्चीवर भेटत. ती गच्चीवर भेटायला आली तर... असा विचार मनात उमटला. ती गच्चीवर येण्याची शक्‍यता तशी कमीच होती. पण त्याला तेवढी शक्‍यताही तपासून बघायची होती. त्याच्या आयुष्याला तेवढ्याच शक्‍यतेचा भक्कम आधार होता. तो गच्चीवर गेला. आतुरतेनं वाट बघू लागला. वाट बघण्याचा प्रत्येक क्षण विदारक होता. क्षणांमध्ये दडलेली भीषणता काळीज चिरत होती. हृदयाचे ठोके वाढत होते. दूर कोठेतरी सूर्य मावळत होता. त्याचं तेज, प्रखरता, ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागल्यानं मनातली तगमग वाढत असल्याचं भासू लागलं. आशा-निराशेच्या दोलायमान स्थितीत आयुष्य पुरतं अडकून पडलं होतं. त्यातून कुठलाच मार्ग सापडत नव्हता. शेवटी त्यानं तिच्या मोबाईलवर फोन लावलाच. मोबाईल नेटवर्क सर्च होताना तो मोबाईलच्या स्क्रीनकडे अगदी श्‍वास रोखून बघत होता. हृदयाचे ठोके ठळकपणे जाणवत होते. जणू हृदयात घणावर घण पडत होते. डोकं अगदी सुन्न झालं होतं. पण तिला फोन लागला नाही. फोन स्वीच ऑफ असल्याचा मेसेज सारखा फ्लॅश होत होता. त्यानं वारंवार प्रयत्न करून बघितला. पण हातात कडवट निराशाच पडत होती. त्याची ठार निराशा झाली. तो हिरमुसल्या चेहऱ्यानं घरी परतला.

विचार करून करून डोकं प्रचंड दुखत होतं. मूडही गेला होता. चेहरा तर पुरता पडला होता. त्यामुळे वहिनी सारख्या तब्येतीचं विचारत होत्या. बरं वाटत असल्याच्या बहाणा करून त्यानं आपल्या खोलीतच राहणं पसंत केलं. बघता बघता मध्यरात्र सरसावली. त्यानं पुन्हा फोन ट्राय केला. पण तो अजूनही स्वीच ऑफ होता. हाती निराशाच पडत होती. तो बेडवर बसून राहिला.

""खरंच मी तिच्यात किती गुंतून पडलोय. आज एक दिवस ती माझ्याशी बोलली नाही, मला भेटली नाही तर सगळा दिवस अस्वस्थ गेलाय. जराही कशात लक्ष लागत नाहीये. एखादं काम करायला घेतलं तरी तिचेच विचार सारखे मनात येत आहेत. खरंच आज माझ्या आयुष्यातील तिचं महत्त्व अधोरेखित झालंय. ती माझ्या जीवनाचा अविभाज्य असा भाग झालीये. अगदी कधीही वेगळा न करता येण्यासारखा. पण ती मला केवळ दिसली नाही म्हणून मी अस्वस्थ झालोय असं आहे का...? नाही. तसं मुळीच नाही. तिला पाहुणे बघायला येणार म्हणून माझं मन चरफडत आहे. तिला सर्वत्र शोधत आहे. माझं प्रेम संकटात असल्यानं अस्वस्थतेला उद्विग्नतेची धार चढली आहे.'' तो स्वगत करीत होता.

""पण तिच्या घरी आज काय झालं असेल... तिला बघायला मुलगा खरंच आला असेल का... त्यानं तिला पसंत तर नसेल केलं ना...!!! नाही. तसं होणार नाही! आणि मुलगा बघायला आला म्हणजे त्यानं तिला पसंत केलं असं थोडंच असतं. बरेच मुलं बघायला येतात. त्यातील काहीच पसंत करतात. आणि मुलीला पण तर मुलगा पसंत हवा ना! त्याशिवाय थोडंच लग्न होत असतं. पण तरीही समजा त्या मुलाला ती पसंत पडली असेल तर... तिच्या घरचे तिला लग्नासाठी आग्रह तर करणार नाही ना... तशीही ती कुणालाही पसंत पडावी अशीच आहे. खरंच काय झालं असेल आज तिच्या घरी...'' त्याचं मन त्याला अशक्‍य असं छळत होतं.

रात्रभर त्याला नीट झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच मोबाईलवर तिचा एसएमएस आला. तिनं त्याला गच्चीवर भेटायला बोलवलं होतं. तो वाऱ्यासारखा धावत गच्चीवर गेला. उत्साहाच्या भरात लिफ्टची आठवणही राहिली नाही. परंतु, काही वेळ वाट बघूनही ती आली नाही. त्यानं पुन्हा एकदा एसएमएस चेक केला. तिनं त्याला अर्ध्या तासानं गच्चीवर भेटायला बोलवलं होतं. त्यानं संपूर्ण एसएमएस न वाचताच गच्चीवर धाव घेतली होती. त्याचं मन विचारांवर कधीच हावी झालं होतं. तिची वाट बघून आता तसाही अर्धा तास झालाच होता. आता ती गच्चीवर येणार या कल्पनेनं त्याला भरून आलं. ती काय सांगेल याची अधीरता मनातील शिल्लक धीर कुरतडत होती. त्याला अस्वस्थ करीत होती. विचारांच्या धुंदीत तो भरकटत असताना ती आली.

तिचे केस विस्कटले होते. कपडे चुरगळले होते. डोळे अगदी आगीसारखे लालभडक झाले होते. थोडी जवळ येताच ती हमसून हमसून रडू लागली. डोळ्यांना फुटणारे अश्रू छोट्याशा रुमालानं पुसू लागली. थोडा वेळ कुणीच कुणाशी बोललं नाही. दोघांमध्ये फक्त शांतता वावरत होती. जरा वेळानं तिनं स्वतःला सावरलं. पण तिची हतबल नजर त्याच्या पायाच्या बोटांवर स्थिरावली होती. त्या नजरेत वर उठण्याची जराही हिम्मत नव्हती...
(समाप्त)