Oct 30, 2011

गोष्ट एका प्रेमाची (तो आणि ती)

तो मूळचा सांगलीचा. इंजिनिअरिंग पूर्ण करून नुकताच पुण्याला आलेला. नोकरी शोधण्याच्या निमित्तानं चुलत भावाकडे तो राहत होता. त्याची दिवसाची सुरवात वेगवेगळ्या कंपन्यांच्या ऑनलाइन ऍडरेसेसवर ई-मेल पाठवून होत होती. तर दुपारचा वेळ मेल्सवर मिळालेल्या प्रतिसादावर आधारित इंटरव्ह्यूज अटेंड करण्यात जायचा. बरेच दिवस होऊनही समाधानकारक यश मिळत नव्हतं. त्यामुळे तो थोडा हताश, निराश दिसत होता. रिकाम्या हातांनी गावी परतावं की नोकरीसाठी नेटानं प्रयत्न करीत राहावं अशा द्विधा मनःस्थितीत तो अडकला होता. गावी परत जाणं ही एक सोईस्कर पळवाट असली तरी ती स्वाभिमानी मनाला पटणारी नव्हती. एकदा मनात बेत पक्का केल्यावर माघार घेणार तो गडी नव्हता. पण नोकरी मिळत नसल्यानं आत्मविश्‍वास कणाकणानं खंगत होता. दिवसागणिक मन मावळत होतं. उमेद सरत आली होती. सर्वत्र विषण्णता फोफावत होती. या शहरात सर्वांना नोकऱ्या आहेत. केवळ मलाच नोकरी मिळत नाही, अशी धारणा मनात जन्म घेत होती. विलक्षण घडामोडींच्या या जगात आपण कोणत्याच कामाचे नाहीत, असा निराशावादी भाव प्रकटत होता. सोबत घरून आणलेले पैसे आता सरत आले होते. आणखी काही दिवस पुण्यात राहणं आर्थिकदृष्टया परवडणारं नव्हतं. चुलत भावाला पैसे मागावे असा विचार मनात डोकावत होता. पैसे मागितल्यावर चुलत भावाने नकार देण्याची शक्‍यता धूसर होती. पण त्यानं आजवर कधीच कुणाला पैसे मागितले नव्हते. त्याला कुणाची उधारी करून ठेवायची मुळीच सवय नव्हती. त्यामुळे आहे त्या पैशांमध्ये काटकसर करून तो राहत होता. नोकरीसाठी जिवाचा आटापिटा करीत होता.

चुलत भावाचा फ्लॅट असलेल्या अपार्टमेंटमध्ये एक सुंदर मुलगी राहत होती. ती दिसायला जेवढी देखणी तेवढीच चुणचुणीत होती. कायम लेगिंग आणि कुर्त्यात वावरणारी ही मुलगी अगदी कुणीही बघताच तिच्या प्रेमात पडावं अशीच होती. ती फारशी बोलकी नसली तरी तिचे पाणीदार डोळे तेवढेच बोलके होते. तिचे डोळे कायम त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत. हा योगायोग होता की भ्रम याचा अजूनही त्यानं शोध घेतलेला नव्हता. मनाशी असलेली कल्पना अत्यंत सुखावह असल्यानं त्याला सत्यात पडायचंच नव्हतं. आहे त्या परिस्थितीत तो समाधानी होता. तिचा फ्लॅट चुलत भावाच्या फ्लॅटच्या नेमका शेजारी होता. या दोन्ही कुटुंबामध्ये अगदी जिव्हाळ्याचे संबंध नसले तरी माफक शेजारधर्म पाळला जात होता.

त्याला ती मुलगी मनापासून आवडली होती. तिला बघण्याची एकही संधी तो सोडत नव्हता. झाडांना पाणी देण्यासाठी ती गॅलरीत आली की तो मुद्दाम गॅलरीत जायचा. तिरक्‍या नजरेनं तिच्याकडे बघायचा. प्रत्येक क्षण मनात जपून ठेवायचा. रात्री झोपताना त्या क्षणांची उजळणी करायचा. त्या क्षणांमध्ये आयुष्य शोधायचा. आणि वेड्यासारखा गालातल्या गालात हळूवार हसायचा. उद्याची अगदी आतुरतेनं वाट बघायचा. आता तिची झाडांना पाणी देण्याची वेळ त्यानं अगदी मनाशी बांधली होती. ती येण्यापूर्वीच तो मुद्दाम गॅलरीत अभ्यास करीत बसायचा. इंजिनिअरिंग झाल्यावर तसा त्याला फारसा अभ्यास नव्हता. पण अभ्यास करीत असल्याचा बनाव करीत एखादं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा इंग्लिश स्पिकिंगचं पुस्तक डोळ्यांसमोर धरून ठेवायचा. तीही न चुकता वेळेवर गॅलरीत यायची. परत जाताना त्याच्यावर वरवर कटाक्ष टाकायची. तिनं त्याच्याकडे एकवार बघितलं तरी कित्येक तास वाट बघण्याचं फलित व्हायचं. पुन्हा पुन्हा वाट बघण्याची अनामिक ऊर्जा मनात संचारायची. पण गाडी केवळ तिला बघण्यावर थांबली होती. तिच्याशी बोलावं की नाही, असा अशक्‍य विचार छळत होता. तर दुसरीकडे, आपण पुण्यात नोकरी शोधायला आलोय, असं मन सारखं बजावीत होतं. पण तिला बघितल्याशिवाय मनातील अस्वस्थता जराही स्वस्थ होत नव्हती. त्याचा अगदी एका वेगळ्या भावविश्‍वात प्रवेश झाला होता. त्याचं वागणं, त्याचं बघणं त्याच्या हातात नव्हतंच मुळी, असं म्हटलं तरीही चालेल.

एक दिवस ती त्यांच्या घरी आली. तिच्या हातात कसलंसं एक मोठं खोलगट बाउल होतं. तिनं स्वतः तयार केलेलं फ्रुटसॅलड आणलं होतं. कदाचित खास त्याच्यासाठी!!! नको एवढा लांबचा अंदाज आताच बांधायला नको! त्याच्या उत्साही मनात येऊन गेलं. तिनं त्याच्या वहिनीला आवाज दिला. त्या किचनमध्ये काहीतरी काम करीत होत्या. त्यांनी त्याला कोण आलंय ते बघण्यास सांगितलं. तो ड्रॉइंग रूममध्ये आला. तिनं त्याच्या हातात बाउल दिलं. वहिनींसाठी फ्रुटसॅलड आणलंय, असं "मुद्दाम' सांगितलं. बाउल हातात घेताना तिच्या बोटांचा हलकासा स्पर्श झाला. त्यासरशी तो अगदी रोमारोमात शहारला. विजेचा हळूवार धक्का बसावा तसा तो स्पर्श सर्वांगात पसरला. हा स्पर्श फारच बोलका होता. तो जागेवरच उभा राहीला. जराही हालचाल न करता. भेटीचा प्रत्येक क्षण मनात साठवू लागला. बाउल देऊन ती परत गेली. पण त्याचं जग पुरतं स्तब्ध झालं होतं. काय करावं ते समजेना. थोड्या वेळात वहिनी आल्या. त्यांनी त्याला छेडलं. तसा तो भानावर आला. असे अनेक गमतीदार प्रसंग घडत होते. तसे दोघं एकमेकांमध्ये नकळत गुंफले जात होते. पण त्यातून काहीएक स्पष्ट होत नव्हतं. तिच्याशी बोलतं व्हावं की एवढ्यावरच समाधान मानावं, हा जीवघेणा प्रश्‍न सारखा छळत होता. नोकरी मिळविण्याच्या धडपडीपेक्षा एक वेगळंच विश्‍व त्याच्यावर स्वार झालं होतं. या विश्‍वानं पुरती मोहिनी घातली होती. त्याचं नाजूक हळवं मन कुठेतरी हरवलं होतं. काही केल्या ते सापडत नव्हतं. तो पुरता गोंधळला होता. वेडापिसा झाला होता. तिची मोहिनी सुटता सुटत नव्हती. उलट दिवसरात्र तीच ती दिसत होती. डोळे उघडे असोत वा बंद! तिचा वावर सारखा भासत होता. स्पर्श तेवढाच ताजा आणि बोलता होता.

एक दिवस पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी तो बेसमेंटमध्ये आला. तीही तेथेच होती. तिची गाडी सुरू होत नव्हती. तिनं त्याच्याकडे मदत मागणं क्रमप्राप्त होतं. पण त्याच्याकडूनही गाडी सुरू होईना. त्याचे अथक प्रयत्न अयशस्वी झाले. पण तिला बोलतं करण्यात तो यशस्वी झाला. दोघांची माफक ओळख झाली. याला मैत्रीची सुरवात म्हणता येईल कदाचित. आता ही मैत्री टिकवायची होती. अधिक दृढ करायची होती. कारण त्यावरच हळव्या भावनांचं इवलसं घरं साकारणार होतं. अधिक बळकट होणार होतं.



*********************************************************************************


""ए किती मस्त ना. हिरव्याकंच शेतात जायचं. पायवाट तुडवायची. नुकत्याच अंकूरलेल्या पिकांना हळूवार स्पर्श करायचा. पानांचा गारवा रोमरोमात दडवायचा. पाय दुखेपर्यंत हिंड हिंड हिंडायचं. शुद्ध हवा श्‍वासात साठवून ठेवायची. शहरी भाषेत म्हणायचं झालं तर शुद्ध ऑक्‍सिजन घ्यायचा. चुलीवर तयार केलेल्या पिठलं-भाकरीवर ताव मारायचा. विहिरीचं मधुर पाणी प्यायचं. आणि छान ढेकर देऊन झाडाच्या गारेगार सावलीत मस्त पडायचं. अगदी बिनधास्त. मनात काही विचार नाही की कसलं काही टेंशन नाही. आराम झाला की पुन्हा शेतात काही खायला मिळतंय का ते शोधायचं. खरंच किती मस्त वाटत असेल ना.'' ती बोलत होती. दोघांच्या ओळखीनं मूर्त रूप धारण केलं होतं. आता दोघं नित्यनियमानं सायंकाळी फ्लॅटच्या गच्चीवर भेटत. गप्पाटप्पा मारत. दिवसभरातील घडामोडींचा ऊहापोह करीत. आता विषयांचं दडपण राहिलं नव्हतं. गप्पा मारताना दोघांनाही विषय सुचत. ते उत्तरोत्तर फुलत जात. दोघांचं आणि दोघांसाठीचं इवलसं जग साकारत होतं. त्यात ते निरंतर गुंफत होते. अगदी अनामिक भावनांच्या साथीनं. मनात किंचितही किंतू-परंतु न ठेवता.

""अगं खरंच. आय जस्ट मीस माय दोज डेज. आमची ना सांगलीजवळ फार मोठी नाही, पण तीस एकर शेती आहे. बाबा नोकरीवर असल्यानं शेतीकडे लक्ष द्यायला तसं कुणी नाही. म्हणून चुलतेच शेती बघतात. वर्षातून एकदा किंवा दोनदा आम्ही गावी जातो. छान शेतीत फिरतो. खूप खूप मजा मारतो. एकदा का गावी गेलं ना, की असं वाटतं की सांगलीला परतूच नये. गावी असलेल्या घरीच राहावं. आमचं मूळ शेतीत असल्यानं शेतीची ओढ ही आमच्या रक्तात आहे. काही केल्या ती जात नाही. आपली शेती, आपलं पीक अशा गोष्टी कायम साद घालीत राहतात.'' शेतीचा विषय निघाल्यानं तो नकळत गावाकडच्या गप्पांनी मोहरून गेला होता. त्याचं मन काही सेकंदात शेतीच्या बंधाऱ्यापलिकडं गेलं होतं. तो पुन्हा बोलू लागला.

""तुझा विश्‍वास बसणार नाही, पण मी गावी गेलो की शेतात काम करतो. तुला वाटेल हा इंजिनिअर मुलगा. हा काय शेतात काम करणार... पण खरंच सांगतो. मजुरांना शेतात काम करताना बघून मलाही हुरूप चढतो. मग मला जमेल तशी कामं करतो. त्याचं खूप समाधान मिळतं. एक प्रकारची आंतरिक ऊर्जा मिळते. शहरात गेल्यावर हीच ऊर्जा सोबत असते.'' तो अगदी हरखल्यासारखा बोलत होता.

""अहो महाराज आता या पुण्यात. सिमेंट-कॉंक्रिटच्या जंगलात प्रवेश करा! मी समजू शकते रे तुझ्या भावना. पण शहर हे शहर असतं. याला स्वप्ननगरी म्हणतात. फ्लॅटमध्ये बसून मोठमोठी स्वप्नं बघायची. ती पूर्ण करण्यासाठी निरंतर झटायचं. अगदी जिवाचं रान करायचं. आणि ती स्वप्नं पूर्ण झाली की समाधानानं आपल्याच पाठीवर उबदार हात फिरवायचा. कारण आपलं कौतुक करायला, आपल्या आनंदात सहभागी व्हायला येथे हक्काचं असं कुणीच नसतं. आपणच आपलं सोबती. यालाच येथे "वे ऑफ लाइफ' असं गोंडस नाव दिलंय. नावं जेवढं मोठं तेवढंच दर्शन खोटं. येथे प्रत्येक क्षणात आनंद शोधायचा असतो. प्रत्येक आनंदात जीवन जगायचं असतं. जीवन जगताना चिमूटभर समाधान टिपायचं असतं. कारण दुःखाची परिसीमा अफाट आहे. त्यात आपण अगदी शुल्लक ठरतो.'' ती अचानक गप्पांमधून भरकटत गेली. अगदी पुराच्या पाण्यात कागदी नौका जाते तशी. पण तिनं स्वतःला लागलीच सावरलं. बाहेर सायंकाळची कातरवेळ सरून रात्रीचा काळोख संथ गतीनं भरारी घेत होता. गप्पांना आवरतं घेत दोघंही घरी परतले. तो दिवस दोघांसाठी तेव्हाच सरला.

असे दिवसांमागून दिसत जात होते. दोघांच्या आयुष्यातला हा सुवर्णकाळ होता. प्रत्येक दिवस महत्त्वाचा होता. दोघांनी सोबत घालविलेला प्रत्येक क्षण अमूल्य होता. काही दिवसांनी तिचा वाढदिवस आला. त्याला तिला काहीतरी खास भेट द्यायचं होतं. जे तिला कायम स्मरणात राहील असं काहीतरी. आणि जे कायम तिच्या सोबत, जवळ राहील. त्यानं आपल्या कल्पनाशक्तीच्या कक्षा रुंदावल्या. प्रचंड विचार केला. महागातले महाग गिफ्ट डोळ्यांसमोर प्रकटू लागले. पण खिशात मोजक्‍याच दमड्या होत्या. स्वस्त गिफ्ट मनाला पटत नव्हतं. स्वस्त काहीतरी देणे म्हणजे निव्वळ कामचलावूपणा आहे असं सारखं मन बजावत होतं. त्याला तर आयुष्यातलं सर्वांत अमूल्य असं आणि काहीतरी हटके गिफ्ट द्यायचं होतं. शेवटी मनाजोगं गिफ्ट आणि आर्थिक साथसंगतीचा ताळमेळ बसला. त्यानं छानशी एक गुलाबी वर्णाची, गुबगुबीत डॉल खरेदी केली. तिला गिफ्ट फार फार आवडलं. तिनं तसं बोलूनही दाखवलं. तिचा वाढदिवस सुखा-समाधानानं पार पडला. असे अनेक क्षण दोघांनी एन्जॉय केले. या प्रत्येक क्षणातील नाजूक धाग्यातून अनामिक नात्याची वीण घट्ट होत होती, अधिक बळकट होत होती.

एक दिवस त्याला झोप येईना. रात्रीचा एक वाजला होता. कसलासा विचार त्याला छळत होता. त्यानं टेबललॅम्प लावला. भावाचा टु-बिएचके फ्लॅट असल्यानं त्याला झोपायला स्वतंत्र खोली होती. खोलीत तो येरझाऱ्या घालू लागला. त्याचं मन माणामणाच्या दडपणाखाली पार दबलं होतं. अगदी कुस्करल्या गेलं होतं. त्यातून काही केल्या सुटका होत नव्हती. तो बेडवर बसला. पुन्हा विचार करू लागला.

""ती खूप छान आहे. ती दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढंच तिचं मन निर्मल आहे. मला ती मनापासून आवडते. माझ्या मनात जशी मुलगी होती ती तशीच आहे. ती मला समजून घेते. माझ्या भावना तिला कळतात. एक अनामिक नातं आमच्या दोघांत आहे. यालाच प्रेम म्हणतात. हे ठाऊक असलं तरी नकळत मनात भीषण शंका उमटतात. हळूहळू त्या दाट होत जातात. मग माझाच माझ्यावरचा विश्‍वास तुटत जातो. पण आय गेस, तिलाही मी आवडतो. परंतु, गेस करायला हा काही परीक्षेतील प्रश्‍न नाही. हा माझ्या आयुष्याचा प्रश्‍न आहे. तो योग्य रीतीनं हाताळला नाही तर मी एक चांगली मैत्रीण गमावून बसेल, त्याचं काय? नाही मी अत्यंत काळजीपूर्वक पावलं उचलायला हवी.'' तो पुरता विचारचक्रात अडकला होता. काही केल्या सुटका होत नव्हती.

""पण असं म्हणतात. प्रेम व्यक्त करायला उशीर करू नये. नाहीतर मनात भावना असतानाही काहीतरी भलतं सलतं होऊन बसतं. पण तसं बघितलं तर मी उशीर मुळीच करीत नाहीये. एकमेकांना समजून घेतल्याशिवाय, एकमेकांच्या भावना जाणून घेतल्याशिवाय कसं काय व्यक्त होणार? आततायीपणा धोक्‍याचं वळणंही ठरू शकतो. खरंच प्रेम हे किती क्‍नफ्युझिंग असतं. पुढे काय करावं ते काहीच समजत नाही.''

दुसरा दिवस उजाडला. पण दररोजप्रमाणे ती त्या दिवशी बाल्कनीत आली नाही. त्याला अगदी चुकल्या चुकल्या सारखं झालं. थोड्या वेळानं वहिनी काही कामानिमित्त तिच्या घरी जाऊन आल्या. आल्याबरोबर वहिनींनी त्याच्यावर अणुबॉम्बच टाकला. तिला बघायला आज पाहुणे येणार होते. तिच्या घरी पाहुण्यांच्या सरबराईची जय्यत तयारी सुरू होती. ही वार्ता कळताच तो अगदी गांगरून गेला. दुर्धर परीक्षेची वेळ अगदी नकळत समोर येऊन ठाकली होती...


*********************************************************************************

तिला पाहुणे बघायला येणार या कल्पनेनंच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. पाहुण्यांसमोर ती चहा आणि पोह्यांचा स्ट्रे घेऊन जात असल्याची दृश्‍यं नकळत डोळ्यांमध्ये खोलवर उमटत होती, कमालीची बोचत होती. ती केवळ माझीच आहे, फक्त माझी... अशी मनाची धारणा होऊ लागली होती. आपण प्रेम व्यक्त करायला फारच उशीर केला, मी आधीच व्यक्त व्हायला हवं होतं, हा उशीर मला नडणार तर नाही ना? असे भीषण विचार मनातला सोलून काढत होते. पण आता वाट बघण्याशिवाय कुठलाच मार्ग शिल्लक नव्हता. देवाच्या कृपेनं काही अघटित घडू नये अशी सारखी याचना सुरू होती. मनात दुसरा कुठलाच विचार शिरत नव्हता. त्याचं जग फक्त तिच्याभोवती फिरत होतं.

तो लागलीच गॅलरीत गेला. कसलंसं पुस्तक डोळ्यांसमोर ठेवून तिची वाट बघू लागला. दुपारी ती सहसा गॅलरीत येत नसे. पण त्याला आता धीरच राहिला नव्हता. ती कदाचित गॅलरीत येईल असा अशक्‍य विचार सारखा मनात डोकावत होता. ती काही कामानिमित्त जरी गॅलरीत आली तरी तिच्याशी किमान बोलता येईल, तिला काही विचारता येईल असं वाटत होतं. देवा तिला गॅलरीत पाठव अशी मनात निरंतर प्रार्थना सुरू होती. तो दुपारभर गॅलरीत बसून राहिला. साधं जेवणंही घेतलं नाही. पण ती काही आली नाही. शेवटी तो निराशेनंच घरात परतला.

त्या दिवशी त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. काय झालं असेल असं सारखं वाटत होतं. तेच ते विचार कमालीचे छळत होते. दररोज सायंकाळी ते दोघं फ्लॅटच्या गच्चीवर भेटत. ती गच्चीवर भेटायला आली तर... असा विचार मनात उमटला. ती गच्चीवर येण्याची शक्‍यता तशी कमीच होती. पण त्याला तेवढी शक्‍यताही तपासून बघायची होती. त्याच्या आयुष्याला तेवढ्याच शक्‍यतेचा भक्कम आधार होता. तो गच्चीवर गेला. आतुरतेनं वाट बघू लागला. वाट बघण्याचा प्रत्येक क्षण विदारक होता. क्षणांमध्ये दडलेली भीषणता काळीज चिरत होती. हृदयाचे ठोके वाढत होते. दूर कोठेतरी सूर्य मावळत होता. त्याचं तेज, प्रखरता, ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागल्यानं मनातली तगमग वाढत असल्याचं भासू लागलं. आशा-निराशेच्या दोलायमान स्थितीत आयुष्य पुरतं अडकून पडलं होतं. त्यातून कुठलाच मार्ग सापडत नव्हता. शेवटी त्यानं तिच्या मोबाईलवर फोन लावलाच. मोबाईल नेटवर्क सर्च होताना तो मोबाईलच्या स्क्रीनकडे अगदी श्‍वास रोखून बघत होता. हृदयाचे ठोके ठळकपणे जाणवत होते. जणू हृदयात घणावर घण पडत होते. डोकं अगदी सुन्न झालं होतं. पण तिला फोन लागला नाही. फोन स्वीच ऑफ असल्याचा मेसेज सारखा फ्लॅश होत होता. त्यानं वारंवार प्रयत्न करून बघितला. पण हातात कडवट निराशाच पडत होती. त्याची ठार निराशा झाली. तो हिरमुसल्या चेहऱ्यानं घरी परतला.

विचार करून करून डोकं प्रचंड दुखत होतं. मूडही गेला होता. चेहरा तर पुरता पडला होता. त्यामुळे वहिनी सारख्या तब्येतीचं विचारत होत्या. बरं वाटत असल्याच्या बहाणा करून त्यानं आपल्या खोलीतच राहणं पसंत केलं. बघता बघता मध्यरात्र सरसावली. त्यानं पुन्हा फोन ट्राय केला. पण तो अजूनही स्वीच ऑफ होता. हाती निराशाच पडत होती. तो बेडवर बसून राहिला.

""खरंच मी तिच्यात किती गुंतून पडलोय. आज एक दिवस ती माझ्याशी बोलली नाही, मला भेटली नाही तर सगळा दिवस अस्वस्थ गेलाय. जराही कशात लक्ष लागत नाहीये. एखादं काम करायला घेतलं तरी तिचेच विचार सारखे मनात येत आहेत. खरंच आज माझ्या आयुष्यातील तिचं महत्त्व अधोरेखित झालंय. ती माझ्या जीवनाचा अविभाज्य असा भाग झालीये. अगदी कधीही वेगळा न करता येण्यासारखा. पण ती मला केवळ दिसली नाही म्हणून मी अस्वस्थ झालोय असं आहे का...? नाही. तसं मुळीच नाही. तिला पाहुणे बघायला येणार म्हणून माझं मन चरफडत आहे. तिला सर्वत्र शोधत आहे. माझं प्रेम संकटात असल्यानं अस्वस्थतेला उद्विग्नतेची धार चढली आहे.'' तो स्वगत करीत होता.

""पण तिच्या घरी आज काय झालं असेल... तिला बघायला मुलगा खरंच आला असेल का... त्यानं तिला पसंत तर नसेल केलं ना...!!! नाही. तसं होणार नाही! आणि मुलगा बघायला आला म्हणजे त्यानं तिला पसंत केलं असं थोडंच असतं. बरेच मुलं बघायला येतात. त्यातील काहीच पसंत करतात. आणि मुलीला पण तर मुलगा पसंत हवा ना! त्याशिवाय थोडंच लग्न होत असतं. पण तरीही समजा त्या मुलाला ती पसंत पडली असेल तर... तिच्या घरचे तिला लग्नासाठी आग्रह तर करणार नाही ना... तशीही ती कुणालाही पसंत पडावी अशीच आहे. खरंच काय झालं असेल आज तिच्या घरी...'' त्याचं मन त्याला अशक्‍य असं छळत होतं.

रात्रभर त्याला नीट झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच मोबाईलवर तिचा एसएमएस आला. तिनं त्याला गच्चीवर भेटायला बोलवलं होतं. तो वाऱ्यासारखा धावत गच्चीवर गेला. उत्साहाच्या भरात लिफ्टची आठवणही राहिली नाही. परंतु, काही वेळ वाट बघूनही ती आली नाही. त्यानं पुन्हा एकदा एसएमएस चेक केला. तिनं त्याला अर्ध्या तासानं गच्चीवर भेटायला बोलवलं होतं. त्यानं संपूर्ण एसएमएस न वाचताच गच्चीवर धाव घेतली होती. त्याचं मन विचारांवर कधीच हावी झालं होतं. तिची वाट बघून आता तसाही अर्धा तास झालाच होता. आता ती गच्चीवर येणार या कल्पनेनं त्याला भरून आलं. ती काय सांगेल याची अधीरता मनातील शिल्लक धीर कुरतडत होती. त्याला अस्वस्थ करीत होती. विचारांच्या धुंदीत तो भरकटत असताना ती आली.

तिचे केस विस्कटले होते. कपडे चुरगळले होते. डोळे अगदी आगीसारखे लालभडक झाले होते. थोडी जवळ येताच ती हमसून हमसून रडू लागली. डोळ्यांना फुटणारे अश्रू छोट्याशा रुमालानं पुसू लागली. थोडा वेळ कुणीच कुणाशी बोललं नाही. दोघांमध्ये फक्त शांतता वावरत होती. जरा वेळानं तिनं स्वतःला सावरलं. पण तिची हतबल नजर त्याच्या पायाच्या बोटांवर स्थिरावली होती. त्या नजरेत वर उठण्याची जराही हिम्मत नव्हती...
(समाप्त)

No comments:

Post a Comment