Dec 11, 2011

डर्टी पिक्‍चर

"डर्टी पिक्‍चर'साठी मी माझे जवळचे नातेवाईक व मित्र-मैत्रिणींपासूनही दूर झाले. अनेकांच्या टेक्‍स्ट मेसेज-व्हिडिओ मेसेजमुळे मी डिस्टर्ब होत होते. भूमिकेसाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला मी तयार आहे, पण टीका हीन पातळीवर जाऊ नये. ती कामाशी सुसंगत असावी...आपला अभिनयप्रवास सांगतेय प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन...

मुंबईच्या चेंबूर उपनगरात दक्षिण भारतीय कुटुंबात मी वाढले. अम्माने लाड केले पण त्याबरोबर शिस्तही लावली. लहानपणी स्वप्नं, महत्त्वाकांक्षा असं काहीच नव्हतं. मी खुशालचेंडू मुलगी होते. मुंबईच्या प्रसिद्ध सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये मी कलाशाखेत प्रवेश घेतला. दरम्यान, एकता कपूरने तिच्या "हम पॉंच' मालिकेसाठी माझी निवड केली. माझ्या कुरळ्या केसांच्या काहीशा वेगळ्या दिसणाऱ्या व्यक्तिमत्त्वासाठी तिने मला निवडलं होतं. "हम पॉंच'मधील राधिका माथूर ही व्यक्तिरेखा मी केलीये, हे आता सांगून खूपजणांना कदाचित खरं वाटणार नाही. असो. माझी आणि एकता कपूरची मैत्री तेव्हापासूनची आहे. माझ्या अभिनयक्षेत्रातल्या प्रवासाला तिथेच सुरुवात झाली.

त्यानंतर कॉलेजमध्येच माझी भेट झाली ती प्रसिद्ध ऍड फिल्ममेकर प्रदीप सरकार यांच्याशी. त्यांनी आमच्या कॉलेजमधल्या काहीजणांची ऍड फिल्मसाठी निवड केली. मलाही त्यात संधी मिळाली होती. ऍड फिल्ममधलं माझं काम बघून त्यांनी "परिणीता' चित्रपटासाठी मला विचारलं. या चित्रपटात ललिता ही मध्यवर्ती भूमिका मिळणार म्हणून मी खूषच झाले होते. पण प्रदीपजींनी केलेली माझी निवड विधू विनोद चोप्रांनी नाकारली. त्यांना सुंदर, ग्लॅमरस, आकर्षक अशा चेहऱ्याची व अभिनयाची जाण असणारी आणि नवीन फ्रेश चेहऱ्याची मुलगी हवी होती. माझं कुरळ्या केसांचं अनाकर्षक ध्यान चोप्रांसारख्या तद्दन फिल्मी दिग्दर्शकाला कसं पसंत पडावं? पण हे आव्हान प्रदीप सरकारांनी स्वीकारलं. माझा मेकओव्हर सुरू झाला. सर्वप्रथम कुरळ्या-राठ केसांना सरळ करण्याची किचकट प्रोसेस चक्क 7-8 तास चाले. माझ्या केसांना सरळ केल्यानंतर ते बंगाली पद्धतीनं स्टाइल करण्यात येत. बंगाली साड्या, सिंदूर, गेटअप असा सगळा जामानिमा केल्यावर माझे अनेक फोटो शूट्‌स केल्यानंतर ते चोप्रांकडे दाखवण्यात येत असत. अशा तब्बल 40 सिक्रेट टेस्ट्‌स व 17 मेकअप शूट्‌स मला करावे लागले. अशा भयंकर कंटाळवाण्या परिस्थितीतून गेल्यानंतर मला ती भूमिका करण्याची संधी मिळाली. पहिल्यावहिल्या भूमिकेसाठी मला खूपच परिश्रम करावे लागले.
"परिणीता'च्या यशानंतर माझ्यावर अनेक पुरस्कारांचा पाऊस पडला, अनेक ऑफर्स आपोआप चालत आल्या. "हे बेबी', भूलभुलैय्या, किस्मत कनेक्‍शन, सलाम-ए-इश्‍क, लगे रहो मुन्नाभाई, हल्लाबोल, नो वन किल्ड जेसिका असे चित्रपट मी त्यानंतर केले. त्यातले बहुतेक यशस्वीही झाले. या यशाच्या प्रवासात टीकेची जोड नेहमीच राहिली, ज्याचं मला खूप वाईट वाटतं.

"परिणीता' केल्यावर माझं नाव प्रदीपजींशी जोडलं गेलं. त्यानंतर माझ्यावर टीका झाली ती मला ड्रेस सेन्स नसल्याची, जी अजूनही होते. "हे बेबी' चित्रपटात माझे ड्रेस खरं तर मनीष मल्होत्रासारख्या नामी डिझायनरने केले. तरीही त्या आऊटफिट्‌सवर प्रचंड टीका झाली. मला जे ड्रेस दिले गेले ते मी आज्ञाधारकपणे घातले. त्यात मला ड्रेसिंग सेन्स नसल्याचा आरोप म्हणजे टू मच होता. माझ्या वाढत्या वयाचा- शरीरयष्टीचा उल्लेख रेडिओ जॉकींनीही करायला आरंभ केला. माझा उल्लेख विद्या बालन असा न होता विद्या आंटी असाच हटकून होऊ लागला. कुठून मी या व्यवसायात आले असं झालं. उद्रेकाच्या भावना मनात क्षणोक्षणी डोकं वर काढत राहिल्या, पण कारकिर्दीची गाडी पुढे पुढे जात राहिली. पुढे "पा' चित्रपट मिळाला. इश्‍किया व पा या चित्रपटांनी मला उत्तम अभिनेत्री म्हणून नामांकनं-पुरस्कार मिळवून दिले. या पुरस्कारांनी-आई वडील व बहिणीच्या शाबासकीने नवी उमेद मिळत गेली. पुढची वाटचाल सुकर होत गेली.

एकता कपूर व दिग्दर्शक मिलन लुथ्रिया यांनी मला "डर्टी पिक्‍चर' चित्रपटात सिल्क स्मिताची भूमिका देऊ केली तेव्हा मला धन्य वाटलं होतं. कारण एका वादग्रस्त अभिनेत्रीचा जीवनप्रवास पडद्यावर साकारणं खूपच जिकिरीचं-मेहनतीचं व आव्हानात्मक होतं. सिल्क स्मितासारख्या अभिनेत्रीची बॉडी लॅंग्वेज दाखवण्यासाठी माझं वजन-शरीर मला वाढवावं लागेल हे मला सांगण्यात आलं. पण मी प्रॉस्थेटिक मेकअपचा आधार घेत पडद्यावर धष्टपुष्ट दिसले. "डर्टी पिक्‍चर'साठी मी माझ्या जवळच्या नातेवाईक व मित्र-मैत्रिणींपासूनही दूर झाले. माझ्या ब्लॅकबेरी फोनमधील मेसेंजर हा ऑप्शन तब्बल 4 महिने बंद ठेवला. कारण अनेकांच्या टेक्‍स्ट मेसेज-व्हिडिओ मेसेजमुळे मी डिस्टर्ब होत होते. भूमिकेसाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला मी तयार आहे. कलाकाराचं ते कर्तव्यच आहे. पण टीका हीन पातळीवर जाऊ नये. ती कामाशी सुसंगत असावी. कलाकाराचं मनोधैर्य खचेल अशी नसावी इतकंच.

अशी मी...

* नाव : विद्या बालन
* घरगुती नाव : विद्याच. कधी तरी बहीण मला प्रेमाने विड्‌स म्हणते.
* एका शब्दात मी : उत्स्फूर्त, उत्साही. हो, मला राग येतो तोंडपुज्यांचा.
* आवडतं पुस्तक : द मंक हू सोल्ड हीज फेरारी.
* आवडती डिझायनर : सब्यसाची मुखर्जी
* आवडती वेशभूषा : आय लव्ह सारीज. सध्या 555 इंडियन एथनिक साड्या माझ्या संग्रही आहेत.
* आवडतं सौंदर्य प्रसाधन : काजळ आणि फक्त काजळ...
* आवडती डिश : साऊथ इंडियन फूड : सांबार-भात, रस्सम-भात.
* अभिनेत्री नसते तर : समाजशास्त्रज्ञ झाले असते.. किंवा लेखक.
* एक वाईट सवय : मला रात्री लवकर झोप लागत नाही. किंवा झोप लागतच नाही म्हटलं तरी चालेल.
* भय वाटतं : टीकेचं- अंधारातल्या सावल्यांचं.
* प्लस पॉइंट : माझा प्रामाणिकपणा.
* प्लॅटिनम ज्वेलरीबद्दल : प्लॅटिनम ज्वेलरी मला आवडते. तसे सगळेच दागिने आवडतात. कार्यक्रमांमध्ये हेवी ज्वेलरी वापरायला मला आवडते.

No comments:

Post a Comment