Dec 11, 2011

आजीचे बक्षीस!

शिक्षकांच्या "सायबा'विषयी त्या आजींच्या कल्पना वेगळ्याच होत्या. त्यात मी बसतच नव्हतो; पण आजीच्या नातवानेच मी "सायब' असल्याचं सांगितलं, तेव्हा आजींनी मला जे बक्षीस दिलं, ते माझ्या आयुष्यातलं सर्वश्रेष्ठ बक्षीस होतं...

माणसाच्या आयुष्यात त्याला विविध प्रकारची बक्षिसे मिळतात. यामध्ये काही बक्षिसे उच्च पातळीवरील असतात. ही बक्षिसे महत्त्वाच्या व्यक्तीकडून संबंधितास देऊन त्याचा गौरव-कौतुक केले जाते. असेच मला जगातील सर्वश्रेष्ठ बक्षीस मिळाले ते मी अद्याप माझ्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवले आहे.
1971ची गोष्ट. 40 वर्षे पूर्ण झाली. मी उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग येथे ट्रेनिंग कॉलेज (डीएड) मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करीत होतो. विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण करावयाचा असतो. या ट्रेनिंगदरम्यान विद्यार्थ्यांना शालाबाह्य व अंतर्गत विषयाचे शिक्षण दिले जायचे. यामध्ये समाजसेवा विषयाचा समावेश होता. योगायोगाने हा विषय माझ्याकडे शिकविण्यास होता. 50 टक्के फिल्डवर्क व 50 टक्के अंतर्गत काम असे या विषयाचे स्वरूप होते. पूर्वी सातवी व अकरावी पास विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षकांची नोकरी मिळत असे. या शिक्षकांना दोन वर्षांचे डीएडचे ट्रेनिंग पूर्ण करण्याचे बंधन होते, म्हणून सरकारने या शिक्षकांना डेप्युटेशनवर ट्रेनिंगसाठी पाठविलेले असायचे. सरासरी 30 वर्षांपुढील शिक्षक (विद्यार्थी) ट्रेनिंगसाठी असायचे. या शिक्षकांचा शिक्षक म्हणून मी विसाव्या वर्षी इथे सुरवात केली. या वेळी सर्वांत मीच लहान दिसायचो.

या ट्रेनिंगदरम्यान दोन वर्षांतून एक वेळ कॉलेज परिसर सोडून सात दिवस बाहेर परगावी समाजसेवा करण्यासाठी शिक्षकांना (विद्यार्थ्यांना) घेऊन जायचे असते. प्रत्येक प्राध्यापकाकडे 15 ते 20 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप असायचा. असाच एक ग्रुप घेऊन मी सोलापूर जिल्ह्यातील एका खेडेगावात गेलो होतो. तिथे आमचा सात दिवस मुक्काम होता. याच गावातील एक विद्यार्थी (प्रा. शिक्षक) माझ्या ग्रुपमध्ये होता. त्याने आम्हा सर्वांना चहा पिण्याचे निमंत्रण दिले. म्हणून आम्ही सर्वजण त्या शिक्षकाच्या घरी चहा पिण्यास गेलो. घर प्रशस्त होते. सर्वसाधारण रात्रीचे सात वाजले होते. खेड्यात वीज नसल्याने आम्हाला एकमेकांचे चेहरे नीट दिसत नव्हते. संबंधित शिक्षकाच्या घरी आम्ही सर्वजण कंदिलाच्या उजेडात भिंतीला टेकून गोलाकार बसलो होतो. यामध्येच मी एका ठिकाणी बसलो होतो. चहाला वेळ होता म्हणून मी सर्व शिक्षकांना सात दिवसांचे नियोजन लिहिण्यास सांगून मीही लिखाण करीत बसलो. प्रत्येक जण आपआपल्या कामात होता. दरम्यान, आम्ही ज्या शिक्षकाच्या घरी गेलो होतो, तिथे त्याची वयस्कर आजी होती. या आजीची उत्सुकता ताणली होती, की या सर्व शिक्षकांचा "सायब' कोण? ती त्या घराच्या चौकटीतून सारखी आमच्याकडे डोकावून बघत होती. सर्वसाधारण चौकटीपासून मी तसा लांबच बसलो होतो. आजीला कोडे पडले होते, की या सर्व शिक्षकांचा सायब लय मोठ्ठा असेल. त्याला मोठं पोट असेल, भल्या मोठ्या मिशा असतील, दिसायला राकट असेल, या दृष्टिकोनातून ती आमच्याकडे भिरभिरत्या नजरेने बघत होती; पण तिच्या मनातला "सायब' तिला आमच्यात कोठेच दिसत नव्हता. शेवटी तिने तिच्या नातवाला (शिक्षकाला) बोलविले व विचारले, ""तुझा सायब कोणता रं?'' त्या शिक्षकाने माझ्याकडे बोट करून दाखविले, ""आजी, हे आमचे साहेब.''
आजी क्षणाचाही विलंब न करता तरा तरा चालत माझ्याजवळ आली आणि आम्हा सर्वांना कळायच्यात त्या माउलीने तिचे दोन्ही राकट हात माझ्या दोन्ही गालांवर फिरवून बोटे स्वत:च्या कानशिलावर कडाकडा मोडली व म्हणाली, ""एवढ्या लहान वयात शिक्षकांचा सायब झालास, धन्य तुझे आईवडील.'' एवढी बोलली अन्‌ निघून गेली. माझ्या अंगावर कौतुकाचे रोमांच उभे राहिले. सर्व शिक्षक माझ्याकडे कौतुकाने पाहात राहिले होते. हेच माझ्या आयुष्यातील ""सर्वश्रेष्ठ बक्षीस'' होय.

No comments:

Post a Comment